माहूर तहसीलदार आणि बिडीओनी दुर्लक्ष केले,आमदार भीमराव केराम यांनी उपोषण सोडविले
नांदेड/माहूर। मौजे वझरा ता. माहूर येथे मागील पन्नास वर्षात गावठाण विस्तार वाढ झाला नसल्यामुळे गावकरी हैराण झाले असून अनेकजन गाव सोडून परगावात स्थलांतरित होत आहेत.शासनाने नवीन प्लॉट्स द्यावेत व घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी घेऊन वझरा येथील नागरिक तथा सीटू कामगार संघटनेचे सभासद कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वझरा येथे दि. एक ऑक्टोबर पासून सहकुटुंब सामूहिक उपोषणास बसले होते.दोन ऑक्टोबर रोजी ग्रामसभेत विस्थापित गावकरी आपली बाजू मांडून कायदेशीर नोंद करणार होते. परंतु गट विकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी ऐनवेळी ग्रामसभा रद्द झाल्याचे सरपंच दिपक केंद्रे यांना कळविले आहे. दोन दिवस सलग सुट्या असल्यामुळे तहसीलदार किशोर यादव आणि गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केले.
निसर्गरम्य वातावरण, घनदाट सागवानी जंगल, शेख फरीद दरग्यावर अखंड कोसणारा धबधबा,वरच्या डोंगरातून येणारा नाला आणि तो अडवून जोखीम पतकरून आणलेले साठवण तलाव, पर्यटन स्थळ अशी विविध ख्याती असलेल्या वझरा ता.माहूर येथील नागरिक मोठ्या संख्येने गावातील मारोती मंदिरा जवळील वाय पॉईंट येथे होते.
एकीकडे झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना आणि गांव, शहराचा विकास होत असताना मौजे वझरा शेख फरीद येथे मात्र मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत. त्याचे कारण असे की, वझरा येथे गावाखारीची जमीन खाजगी मालकाची नाही. चोहबाजूची सर्व जमीन ही श्री दत्त शिखर संस्थांनची आहे. अर्थातच मालक म्हणून सुपरिचित असलेल्या महंत यांना आज पर्यंत प्लॉट्स पाडून गावठाण विस्तारवाढ करावा म्हणण्याची हिंमत कोणी केली नाही. हे सर्व कायदा म्हणून नाही तर श्रद्धा आणि भावनेचा मुद्दा आहे.प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले होते.
वझरा येथील मूळचे रहिवाशी असलेले कॉ.गंगाधर गायकवाड हे नांदेड येथे स्थायिक झाले असले तरी त्यांनी मागील दोन वर्षांपासून वझरा गावठाण विस्तारवाढ आणि सोलापूर कुंभारीच्या धरतीवर गावखारी येथे प्लॉट्स पाडून द्यावेत आणि घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारकडे सातत्याने केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हिरवा कंधील दाखविला असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र उदासीन असल्याचे दिसते.उपरोक्त मागण्या घेउन सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली असून मोर्चे देखील काढण्यात आले आहेत.
सीटू ने मागच्या आठवड्यात नांदेड शहरातील हजारो पूरग्रस्तांना दिलासा देत नऊ कोटी रुपये वाटप करण्यास भाग पाडले असून त्यांनी यासाठी दोन महिन्यामध्ये चार आंदोलने करून अनेक वेळा जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडे पत्र व्यवहार केला आहे.
गांधी जयंतीच्या पुर्व संध्येला त्यांनी सामूहिक उपोषणास सुरवात केली होती.
असून होणाऱ्या ग्राम सभेमध्ये या. उपोषणाचे पडसाद उमटणार आहेत. मागील पन्नास वर्षांपासून विस्थापित असलेल्या वझरा गावामध्ये काय कारवाई होणार याकडे संपूर्ण गावाचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासनाच्या निर्णयाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
माहूर- किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव रामजी केराम यांना कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उपोषणाची माहिती दिली आणि आमदार एका तासाच्या आत वझरा शेख फरीद येथे आपल्या ताफ्यासह पोहचले. त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय काँगेस पक्षाचे नेते नामदेवराव केशवे, युवा नेते सुदर्शन नाईक, संतोष मरस्कोले यांच्यासह अनेक पदाधिकारी होते. आमदार केराम यांनी श्री दत्त शिखर संस्थांच्या सचिवांशी फोन वरून स्पीकर ऑन करून थेट चर्चा केली.
पुढील बोलणाऱ्या सचिवानी समाधानकारक वक्तव्ये करीत वझरा येथील दोन व्यक्तींना गडावर बोलून घेतले तेव्हा गावकरी आणि उपोषणार्थीच्या वतीने शिक्षक साईनाथ नागरगोजे व सरपंच दिपक केंद्रे यांना पाठविण्यात आले. त्यांनी सकारात्मक चर्चा करून चांगला निरोप आणल्यामुळे उपोषणार्थीनी समाधान व्यक्त केले.आदरणीय महंत महाराज यांना निवेदन देऊन विनंती करण्याचा निर्णय उपोषणार्थीनी घेतला असून गडावरून आलेल्या निरोपामुळे आणि आमदार केराम यांनी उपोषण सोडविण्यासाठी विनंती केल्यामुळे रात्री उशिरा उपोषण थांबविण्याचा निर्णय कॉ. गंगाधर गायकवाड यांनी जाहीर केला.
उपोषण यशस्वी करण्यासाठी स्थानिक कमिटीचे सचिव विक्रम टाकळीकर, उपाध्यक्ष जाणू पवार,बाबू टाकळीकर, सुनील चांदेकर, बाबू दोहिले, वाल्मिक मुंडे,ज्ञानेश्वर उरवते, केशव राठोड, प्रमोद कदम,चंद्रकांत लोखंडे,कॉ.लता गायकवाड, वंदनाबाई मुरकुटे, प्रयागबाई लोखंडे,रामदास लोखंडे,राजू टेंबरे,इंदिराबाई टेंबरे, महिला कमिटीच्या अध्यक्षा अर्चना नटवे,सचिव मंगलबाई टेंबरे,सायनाबाई जाधव,वदंनाबाई कुमरे,भूमिका नटवे,मोहिनी केंद्रे,देवकबाई टेंबरे, पुर्नाबाई चव्हाण,शायनाबाई जाधव,तसेच पदाधिकारी राजू टेंबरे,कॉ.वाल्मिक मुंडे, प्रयाग प्रचाके, गयाबाई कुडमेथे,कॉ. विशाल मुंडे,आदी प्रयत्न केले. या उपोषणास सरपंच दिपक केंद्रे यांनी पूर्ण पाठींबा दिला असून गावठाण विस्तार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी उपोषण स्थळी तीनही दिवस उपस्थित राहून सांगितले.