
मुंबई। ज्येष्ठ पत्रकार तथा मराठवाडा नेताचे जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद उमाटे आणि दैनिक श्रमिक एकजूटचे व्यवस्थापकीय संपादक किरण कुलकर्णी यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबईच्यावतीने दिला जाणारा ‘पत्रकार भूषण-2024’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबईतर्फे प्रतिवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व समाजजीवन संपन्न करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यंदा संस्थेचा 23 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ असून संस्थेच्या पुरस्कार निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी सायं. 4 वा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह (शारदा सिनेमाच्या शेजारी), दादर, मुबंई येथे देशोन्नतीचे संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ.सिसिलिया कर्व्हालो व दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य एकनाथ बिरवटकर यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे व किरण कुलकर्णी यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
