उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!
मुंबई| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचे, अन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
गौतम बुद्धांची शिकवणूक अंगिकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करुया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.