एकीमधूनच गावाचा उत्कर्ष होतो, हे हाडोळी गावाने दाखवून दिले
नांदेड| एकीमधूनच गावाचा उत्कर्ष होतो, हे हाडोळी गावाने दाखवून दिले आहे. श्रमदानातून या गावाने समृद्धी साधली आहे तसेच लोकसहभागातून विकासाकडे हाडोळीची वाटचाल असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे आवर सचिव तथा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावरून पात्र ठरलेल्या गावातील विकास कामांची तपासणी करिता राज्यस्तरीय तपासणीने हाडोळी गावाला आज भेट देवून पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसचिव बाळासाहेब हजारे सहाय्यक, सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नांदेड जिल्हा परिषदच्या जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव केंद्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, समाजशास्त्रज्ञ महिंद्र वाठोरे, विस्तार अधिकारी सूर्यकांत कांबळे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, हाडोळी येथे श्रमदानातून लाखो रुपयांची कामे झाली आहेत. गावकऱ्यांच्या एकोप्यातून स्वच्छतेत केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. प्रारंभी बैलगाडीतून मिरवणूक काढून, टाळ मृदुंगासह रॅली काढून व औक्षण करून समितीचे शाल व बुके देऊन ग्राम पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर गाव स्तरावर स्पर्धेच्या अनुषंगाने गावफेरी करून तपासणी करण्यात आली. तब्बल सहा तास समितीने गावाची पाहणी करून गावकऱ्यांकडून स्वच्छते विषयी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील इतर गावांनी आदर्श घेण्याजोगे काम हाडोळी ग्रामपंचायतीने केले असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.
धोबीघाट, पाच हजार वृक्ष लागवड व ओपन जिम, मोफत पिठाची गिरणी, स्वयंचलित किराणा दुकान आदी नाविन्यपूर्ण उपक्रम हाडोळीने राबवले आहेत. ही सर्व कामे पाहून त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी सरपंच अनिता माधवराव अमृतवाड, उपसरपंच अनुसया पाटील, दुर्गा किनेवाड, विजयालक्ष्मी कृष्णुरे, माधवराव अमृतवाड, ग्रामसेविकासव ए. एस. लिंगापुरे, विजयकुमार टोकलवाड, दमकोंडवार, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला, शालेय विद्यार्थी, शिक्षक, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.