श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रासाठी भूषणावह – नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांचे प्रतिपादन
नांदेड| श्रामणेर प्रशिक्षण केंद्र ही एक भिक्खू संघाच्या विचार, वावर आणि विहाराने पवित्र बनलेली भूमी आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाचा जो विचार इथे निर्माण होतो त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार होतो. या तालुक्यातील कार्यरत असलेले हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे असे प्रतिपादन नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह मंडळ अधिकारी खिल्लारे, इंजि. भारत कानिंदे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रज्ञाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, रणजीत गोणारकर, चंद्रकांत ढगे, रामराव भुक्तरे, डॉ. खाडे, संतोष खिल्लारे, टी. पी. वाघमारे , आप्पाराव नरवाडे नागोराव नरवाडे, रामा नरवाडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भंतेजींनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले याचा मला आनंद वाटला. माझी सुद्धा या केंद्राला भेट देण्याची इच्छा होतीच परंतु हा योग जुळून आला मी खरं तर अगोदरच या केंद्राला भेट द्यायला पाहिजे होती. पण व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. परिसर पाहून मला खूप आनंद वाटत आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.भविष्यात हे फार मोठे सेंटर होईल लोकांना येथे ध्यान करण्यासाठी संधी उपलब्ध होईल या ठिकाणावरून शांतता मिळेल सर्वांनी सहकार्य करावे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी मदत केली त्या सर्वांना धन्यवाद देतो असे ते म्हणाले. श्रामणेरांकरिता निर्माण होणारी ही दीक्षाभूमी आपल्या मंगल कामनांनी पूर्णत्वास जावो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी भिक्खू संघाचे भोजनदान, बोधीपूजा संपन्न झाली. त्यानंतर उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले. तसेच ध्यानसाधना त्रिरत्न वंदना घेण्यात आली. सकाळपासूनच परित्राणपाठ, सूत्तपठण, गाथापठण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. दरम्यान तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या गाडी पार्किंग परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सदृढ पर्यावरणासाठी वृक्षसंवर्धन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांना भोजनदान आणि उपासिकांनी आर्थिक दान, फलदान, वस्तूदान ही पारमिता केली. भिक्खू संघाच्या आशिर्वचनाने पौर्णिमोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात शहरातील हर्ष नगरातील बौद्ध उपासिकांच्या वतीने उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांना भोजनदान दिले.दिवसभरात वर्षावास या पवित्र पावन पर्वावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथांचे दान करण्यात आले. सुगाव येथील भीमशाहीर सुभाष लोकडे आणि संचाचा बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. स कार्यक्रमाचे प्रास्ताविक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांनी केले तर आभार प्रा. एस. एच. हिंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.