नांदेड। गेल्या चार दिवसांपासून नांदेड उत्तर मध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी स्वखर्चातून पुन्हा एकदा मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपरी येथील कोटीतीर्थ हाऊस पंप मध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नांदेड उत्तर भागावर पाणी संकट ओढवले आहे. त्यामुळे नांदेड उत्तर मधील लाखो लोकांच्या घशाला कोरड लागली आहे. शहरातील सर्वच भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड शहराला पर्यायी पाणी व्यवस्था म्हणून आसना नदी येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यातूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही .त्यामुळे आपल्या भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये. कोणत्याही नागरिकावर पाहण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये. यासाठी शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी स्वखर्चातून टँकर सुरू केले आहेत .
आज अंबा नगर , गौतम नगर ,बाबा नगर , सांगवी भागातील अनेक वस्त्यांमध्ये मोफत पाणीपुरवठा करण्यात आला तर उद्यापासून नांदेड उत्तर मध्ये मागेल त्याला पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहितीही कोकाटे यांनी दिली आहे . यापूर्वीही तब्बल 15 वर्ष दत्ता पाटील कोकाटे यांनी जनतेसाठी मोफत जलसेवा केलेली आहे.