मुंबई| काँग्रेसच्या विचारांनी प्रभावित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला रामराम करत अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
तसेच चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनी देखील भाजपत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना अशोकराव चव्हाण यांनी संबोधित केले. यावेळी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊ. अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रात आम्हाला बळ मिळेल. त्याचा आम्हाला फायदा होईल. मी त्यांचे स्वागत करतो. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणा पलीकडे सबंध होते. राज्याच्या विकासासाठो काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करतो आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपमध्ये आलो आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटल्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, आज मी नवा राजकीय प्रवास सुरू करत आहे. भाजपसाठी जोमाने काम करणार आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितील त्या पद्धतीने मी काम करणार आहे. भाजपच्या ध्येयधोरणानुसार मी काम करणार असून, पक्ष देईल् ती जबाबदारी मी स्वीकारेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात महायुतीची शक्ती वाढली आहे. अशोक चव्हाण यांनी पदाची अपेक्षा नसल्याचे सांगितले असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मुख्य प्रवाहात काम करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील सर्व महत्वाचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातील असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच विरोधकांना पक्ष, नेते सांभाळता येत नाहीत. याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावे असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. गेली तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. चव्हाण यांचे आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्राम पंचायतींवर वर्चस्व आहे. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय झाला होता. त्यांना 4 लाख 86 हजार 806 मते मिळाली होती. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 मते मिळाली होती. ते 40 हजार 138 मतांनी पराभूत झाले. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांचा मोठा फटका बसला होता. भिंगे यांना 1 लाख 66 हजारांहून अधिक मते मिळाली होती. पण आता चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपला आपल्या ताब्यात ठेवता येईल असा दावा केला जात आहे.