नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| यंदा परतीच्या पावसात वरून राजाने झोडपून काढल्याने ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांचा सुकाळ होऊन अक्षरशा १० रुपये किलोने फुले विकून तोटा सहन करावा लागला होता. मात्र दिवाळीच्या स्वागतासाठी अन्य जातींची फुले कमी तर झंडूच्या फुलांना लक्ष्मी पूजनासाठी विशेष महत्त्व आले आहे. बाजारात आलेल्या झंडुच्या फुलांना शेवटच्या क्षणी १०० रुपये किलोचा भाव मिळाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान मानले असले तरी फुलांचे झालेले नुकसान आणि त्यामुळे बसलेला आर्थिक फटका कदापि भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया फुल विक्रेता शेतकरी प्रल्हाद भैरवाड यांनी दिली आहे.
सण – उत्सव , समारंभाचे वातावरण प्रसन्न करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. ताज्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बाजारपेठेत दिवाळीच्या पर्वावर झेंडूच्या फुलांचे ढीग लागलेले दिसतात. नांदेडच्या होलसेल व रिटेलर बाजारात दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी फुलांचे भाव बदलतात. तरीही ग्राहकांची फुलांना मोठी मागणी कायम असते. स्थानिक फुलांमध्ये झेंडू , गुलाब , मोगरा, शेवंती यांचा तर विदेशी फुलांमध्ये ऑर्किड, जरबेरा, कार्निशा, ग्लॅडुला, चायना रोझ, ग्रीन पिंक हाऊस शेवंती, व्हाईट ग्लॅडुला या बरोबरच आठ ते दहा अन्य फुलांचे प्रकार दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत दाखल होतात.
दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापारी, दुकानदार, मंदिरे, अपार्टंमेंटवर सुशोभीकरण करण्यासाठी झेंडू , गुलाबाच्या फुलांच्या हारांना मोठ्या प्रमाणावर मागणी करतात. यामुळे फुल विक्रेते ऑर्डरप्रमाणे हार बनवून देतात. दिवाळीच्या पर्व काळात कारागिर दिवसरात्र एक करुन हार तयार करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र या वर्षी परतीच्या पावसामुळे फुलांची आवक कमी झाली तर झंडूची फुले बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर परिसरात दसऱ्याच्या मुहूर्तावर फुल उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशा 10 ते 20 रुपये किलो दराने झंडूची फुले विकावी लागली होती. फुलांच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या फुलतोडणीची मजुरीसुद्धा निघाली नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. दरम्यान दिवाळीचा मंगलपर्व सर्वच लोकांनी दिवाळीच्या दिवशी आपली प्रतिष्ठाने, वाहने, दुकान – घरांची दारे, फुले व आंब्याच्या पानानी सजविण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी १०० रुपये किलोचा भाव मिळाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान मानले असले तरी फुलांचे झालेले नुकसान आणि त्यामुळे बसलेला आर्थिक फटका कदापि भरून निघणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अतिशय साध्या पद्धतीने व प्रदूषणमुक्त पटाख्याने साजरी होत असल्याचे पहावयास मिळले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झंडूच्या फुलाबरोबर पूजेला लागणाऱ्या उसालाही मागणी वाढली वाढली असून, 100 रुपयाला पाच नग ऊस, 50 रुपयाला पाच केळीचे कंद तर १०० रुपये किलो झंडूची फुले विकत घ्यावे लागल्याने महालक्ष्मीच्या पूजेला केळीच्या पानासह, उसालाही तेवढेच महत्व आले आहे. यंदा दिवाळीच्या बाजारात गर्दी दिसून आली असली तरी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे श्रीमंताच्या घरी फटक्याची धूम तर गरिबांना दिवाळी पुरणपोळीने आणि अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना सध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगावसह अनेक भागात दिसून आले आहे.