लातूर| कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारव्दारे राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षण(एनपीएसएस)मध्ये कापूस, मिरची, मका, भात व आंबा या पिकांच्या कीड रोगाबाबत सर्वेक्षणासाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये एनपीएसएस ॲप (NPSS APP)डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी स्वत: पिकावरील किडीची निरिक्षणे ॲपवर नोंदविल्यास त्यावरील उपाय योजना शेतकऱ्यांना मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एनपीएसएस ॲपचा वापर करण्याचे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले आहे.
एनपीएसएस प्रणालीच्या वापराबाबत नुकतेच लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात सादरीकरण झाले. नागपूर येथील राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे सहसंचालक डॉ.ए.के.बोहरीया यांनी एपीएसएस प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी महेशकुमार तीर्थकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या ॲप मध्ये विभागातील प्रमुख पिकांचा टप्प्याटप्प्याने समावेश होणार आहे. शेतकऱ्यांना पिकांवरील किडीचा प्रादूर्भाव नियंत्रणासाठी कमी खर्चात उत्तम नियंत्रण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना ॲपच्या माध्यामातून सुचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअर मधून एनपीएसएस ॲप (NPSS App) डाऊनलोड करून या प्रणालीचा वापर करावा. ही प्रणाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर असून प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रणालीचा वापर करून हे ॲप अधिक परिपूर्ण होण्यासाठी कृषी विभागास अभिप्राय द्यावेत. त्यामुळे या ॲप मध्ये आणखी सुधारणा करता येईल, असेही प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.