आर्टिकल

दरवर्षी दीक्षाभूमीतून‌ परततांना…

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर या देशातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तत्कालीन महार समाजात आणि इतर ज्या जातींनी स्वयंप्रेरणेने बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आल्याचे आपण पाहतो आहोत. लक्षावधी लोकांच्या जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता देशाच्या इतिहासात घडून आलेली जगाच्या नकाशावर कोरलेली चौदा आॅक्टोंबरची ही एकमेव अद्वितीय क्रांती आहे. याकडे अनेक जण धर्मांतर म्हणून पाहतात. परंतु हे धर्मांतर नव्हे तर ते मूलगामी महामूल्यांतर होय. बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही सरळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची प्रक्रिया नव्हे. धम्म आचरणारंभ म्हणजे माणूस म्हणून जगण्याची सुरुवात आहे. एखादा धर्म नाकारला म्हणजे त्या धर्माने लादलेले कायदे, नियम वा जी काही बंधने असतात ती नाकारणे किंवा त्याग करणे आणि दुसरा धर्म आधीच्या धर्मापेक्षा अधिक चांगला आहे, त्याच्या धर्मगुरूचे नियम, कायदे किंवा जी काही बंधने आहेत तसेच काही सेवा सुविधा आधीपेक्षा चांगल्या आहेत आणि काही जास्तीचे फायदे आहेत असे काही नसते. बौद्ध धम्म हा धर्म नाही. धम्म हा धर्म यासाठीच पालीभाषेतील शब्द असला तरी धम्म ही धर्मसंहिता नसून ती आचारसंहिता आहे. मानवतावादाचा पुरस्कार करणारी ती संस्कृती आहे. बाबासाहेब त्या वेळी अत्यंत योग्य होते. या मुल्यांतराने माझा नवा जन्म होत आहे ही वैचारिक परिवर्तनाची मूल्यपेरणी झाली आणि म्हणूनच जग या क्रांतीकारी घटनेकडे धम्मस्विकार ही गुलामगिरी नाकारुन माणूस बनण्याचे स्वातंत्र्य स्विकारणे या दृष्टीने पाहते.

धम्मामध्ये माणूस स्वतंत्र असतो. या माणसाने हे स्वातंत्र्य पूर्णपणे स्विकारलेले असते. तो स्वतःला आणि इतरांना स्वतंत्र माणूस किंवा व्यक्ती या दृष्टीनेच पाहतो. यात कोणताही लिंगभेद नसतो. एवढेच नव्हे तर सृष्टीचा कोणताही जैविक घटक त्याच्यासाठी एक स्वतंत्र जीव किंवा व्यक्तिमत्व असते. धम्माचरणातून सगळ्यांवर सुसंस्कार व्हावेत अशी त्याची अपेक्षा असते. मूळात अशी व्यक्ती धम्मसंहिता हीच माणसाच्या जगण्याचे संविधान मानते. याच्या प्रास्ताविकेतच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही सौंदर्यमूल्ये जोपासलेली असतात. दीक्षाभूमीवर जाणारा हरेक अनुयायी परततांना हे सौंदर्यविश्व आपल्या मेंदूत जन्माला घालूनच निघतो. त्याने आपल्या जीवनात कधीही कुठेही या सौंदर्यसृष्टीशी प्रतारणा करता कामा नये. याऊलट त्याने संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून भारताच्या भूमीवर पाय रोवून उभे राहिले पाहिजे.‌ सर्व धम्मनिष्ठ व्यक्तींना एकत्र करून संविधान मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे आणले पाहिजे. एवढेच नव्हे तर पुढील काळात तमाम भारतीयांच्या समोर हा मुद्दा प्रतिष्ठापित झाला पाहिजे. या देशातील सर्वात मोठ्या प्रमाणावर लोकांच्या डोक्यात आपल्या जीवन जगण्याचे प्रयोजन जन्माला यायला हवे. स्वतः त्यांनी तसे जगावे आणि दुसऱ्यांनाही जगवावे. हे प्रशिक्षण देण्याची आणि घेण्याची जबाबदारी एकमेकांवर लोटून चालणार नाही.‌ ही भूमिका बौद्धांनी आणि बौद्धैत्तरांसह व्यापक प्रमाणावर मोठ्या मनाने स्विकारायला हवी.

ही भूमिका स्विकारणं आणि ती निभावणं वाटतं तितकं सोपं नाही. या कार्यापुढे अजूनही अनेक आव्हाने आहेत. बावीस प्रतिज्ञांची अभियानं अजूनही चालवावीच लागणार आहेत. कारण बावीस प्रतिज्ञा ह्या धम्माचे केवळ प्रवेशद्वार नव्हते तर ते जीवनायनच होते. विविध स्वरूपात जिवंत असलेली जातीयता, त्यामुळे होणारी अन्याय अत्याचारांची प्रकरणं तसेच पुढे होणारी आंदोलनं, ताणतणाव आणि मग सामाजिक सलोखा अशी बिकट वाट चालत रहावं लागतं. सरकारची ध्येय धोरणं यावरून जनमानसात निर्माण होणारी संविधानविरोधी भूमिका, पसरणारी अस्वस्थता, निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार, गैरव्यवहार आणि त्यातून येणारे नैराश्य ही आंबेडकरी समाजापुढील मोठी आव्हाने आहेत.

राजकीय क्षेत्रातील अनेक गट – तट, शेकडो संघटनांमध्ये विभागलेला समाज, पराकोटीची व्यसनाधीनता, सतत वाढणाऱ्या महागाईसोबतची बेरोजगारी अशा काही समस्या न संपणाऱ्याच आहेत. दीक्षाभूमीवर अभिवादन करुन परततांना आपण जी जबाबदारी घेऊन बाहेर पडतो, ती पुस्तकांचा जुडगा घेऊन वाहणाऱ्या ओझ्यापेक्षाही अवजड असू शकते पण घाबरण्याचे काही कारण नाही. पुस्तके वाचून परिवर्तनाचा विचार करणं हे साहजिकच आहे. त्यासाठी धम्मचळवळीला गतिमान करण्यासाठी काम करणं, सतत संघर्षरत राहणं, समस्यांची सोडवणूक करणं ही पुढील काळातील गरजेची कामं आहेत. ही सुरुवात आपल्यापासून, आपल्या जातसमुहापासून करण्याचं हे कठीण कार्य आहे. परंतु या क्रांतीभूमीवरुन जगाकडे पाहण्याची दृष्टी बाबासाहेबांनी दिलेली आहे.‌ इथे दरवर्षी कसलीही मौजमजा करण्यासाठी तुम्ही येत नाही तर तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या आप्तेष्टांसाठी, परिसरातील सर्वच धम्मबांधवांसाठी, जातीच्या बाहेर जाऊन, देशातील तमाम भारतीयांसाठी आणि शेवटी जनकल्याणाचा त्याहीपुढे संबंध जीवसृष्टीच्या कल्याणाचा विचार घेऊन तुम्ही परतण्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.

या दिवसाचं फार महत्वं आहे. नागपूरकडे प्रयाण करण्याआधी ते जाणून घ्यायला हवं. हा प्रवास येवले मुक्काम ते १४ आॅक्टोबर १९५६ पर्यंत चा आहे. यावेळी चंद्रपुरचाही काही संदर्भ आहे. धम्मदीक्षेसाठी नागपूरचीच निवड का केली हाही एक विषय आहे. हा इतिहास अभ्यासावाच लागत असतो.‌ हा अभ्यास करताना नवे अभ्यासक दसऱ्याच्या दिवशी साजरे होणारे धम्मचक्र प्रवर्तन/अनुवर्तन यावर विशेष जोर देतात. यावेळी अनेकजण अशोक विजयादशमीच्याच दिवशी असलेले धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन यासंबंधीचे प्रयोजन मांडतात. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे होणारा कालावधी आपण मोजू शकतो. परंतु त्यामागील उद्देश, भूमिका मोजायची नाही तर ती जनमानसात रुजवायची आहे. बाबासाहेब पंढरीचा पांडुरंग म्हणजे भगवान बुद्धच आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवतात पण तो बुद्ध आणि ते पंढरपूर स्विकारत नाहीत. दुसरी नवी पंढरी निर्माण करतात. यामागीलही ही महत्वकांक्षी भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांचे आयुष्य आणि कार्य बारकाईने समजून घ्यावे लागणार आहे.‌

दीक्षाभूमी येथे आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्राट सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमीवर आणण्यात येत आहे. याठिकाणी कर्नाटकातून हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असून ते धम्म दीक्षा घेणार आहेत. ही घटना काही छोटी नाही. तेव्हा आपल्याला काय करायचे आहे, कसे करायचे आहे याचा वार्षिक आराखडा तयार करुन त्याचे अवलोकनही अपेक्षित आहे. सतत संवाद , चर्चा, परिसंवाद, विचारमंथन, अनौपचारिक बैठका आयोजित व्हाव्यात. यातून मागील त्रुटी आणि पुढील दिशा समजतील. तेव्हा दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर किती तळापासून काम करण्याची गरज आहे हे समजून घेता येईल.

अत्यंत बारकाईने आधी बाबासाहेबांनाच समजून घेणं हेच आता आपल्यापुढे मोठे काम आहे. १४ एप्रिल, अशोक विजयादशमी, सहा एप्रिल, बुद्ध जयंती हे काही सण उत्सवाचे दिवस नाहीत. आपण सर्वच जण शुद्ध होण्याचे दिवस आहेत. आपण शरिरानं आणि मनानं शुद्ध होण्याचे दिवस आहेत. आपल्यातील विकार जाळण्याचे दिवस आहेत. आपण अधिकाधिक सुंदर होण्याचे दिवस आहेत. तसेच अधिक दृढ, दिवसेंदिवस कणखर आणि लढाऊ होण्याचे दिवस आहेत. छोटे मोठे गैरसमज दूर करून संवादी बनत असतांना प्रामाणिकपणे आपल्या धम्मकार्याबद्दलची सुरुवात या दिवसांपासून व्हावी. नेतृत्वाबदल, कार्यकर्त्यांबद्दल, प्रौढ धम्म उपासकांबद्दल, भिक्षूंबद्ल कोणताही आकस, द्वेष ठेवण्याची आवश्यकता नाही. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांना योग्य दिशेने मार्गस्थ होण्यासाठी निर्माण झालेली लोकभावना कार्यकारी लोकसमुहाच्या रुपाने सुयोग्य शस्त्रक्रिया करतो, ही अपेक्षा ठेवून धम्माबद्दलचे अधिकाधिक ज्ञान मिळवत, इतरांना ते सांगत दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याचे महत्कार्य आपल्या हातून का होऊ नये? भारताला प्रबुद्ध भारत बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. भारत बौद्धमय करण्याची प्रक्रिया इतिहासातील बाबासाहेबांच्याच संबंधित संदर्भ देऊन यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे किंबहुना ती बाबासाहेबांनीच योग्यरीत्या यशस्वी केली आहे हे छातीठोक सांगून बाजूला होणे ठीक नाही. छोट्या छोट्या तपशीलावरुन भांडत बसण्यापेक्षा आणि दीर्घकाळासाठी विसंवादी होणं हे चळवळीसाठी मारक आहे. यासाठी सतत कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विजयादशमीला दीक्षाभूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर निव्वळ जाऊन येणे याला काही अर्थ नाही.

– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो.‌ ९८९०२४७९५३.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!