प्रभावीपणे समाज माध्यमाद्वारे कार्य करणाऱ्या युवकांशी जिल्हाधिकारी साधणार संवाद – मतदान जागृतीसाठी आवाहन
नांदेड| सामाजिक सुरक्षितता व साक्षरतेसाठी सोशल मिडिया अर्थात समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी उपयोग अनेक व्यक्ती करीत आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, ब्लॉग आदी माध्यमांचा प्रभावी उपयोग करणाऱ्या युवक-नागरिक यांच्यासमवेत मतदान जनजागृतीसाठी चर्चा करता यावी व यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेता यावा या उद्देशाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत संवाद साधणार आहेत. दिनांक 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात हा संवाद दुपारी 5 वा. होईल.
नांदेड शहरातील जे व्यक्ती राजकीय पक्षांसमवेत निगडीत नाहीत अथावा जे युवा, नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाहीत अशा युवकांनी-नागरिकांनी या विधायक उपक्रमासाठी मुक्त संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले.
10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा करण्याचे निर्देश
“मानवी हक्क दिन” येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सोमवार 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. यात इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशीनिस्ट, फिटर, टर्नर, मेकॅनिक, वेल्डर एकुण 180 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन एस. व्ही. सुर्यवंशी अंशकालीन प्राचार्य मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे.