नांदेड (जि.प्र.) हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटपावरून संचालक व व्यापाऱ्यात वादावादी झाली. शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात काहीवेळ तणाव पसरला होता.

हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गाळे बांधण्यात आले होते. 77 गाळे वाटपाचा लिलाव करण्यात आला होता. यासाठी 10 हजार रुपये भरून लिलाव करण्यात आला.पण गाळे वाटपाच्या वेळी संचालक व व्यापाऱ्यात वाद सुरू झाला. वाद वाटत जाऊन शाब्दिक चकमक झाली. संचालक व व्यापारी एकमेकांवर धाऊन गेले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. अखेर उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.

गाळे वाटपात संचालकांनी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. पण संचालकांनी व्यापाऱ्यांचा आरोप फेटाळून लावला. दुपारपर्यंत गाळे वाटपाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती मात्र अंतिम टप्प्यांमध्ये काही गाळे व्यापाऱ्यांना कमी लिलावाच्या बोलीमध्ये देण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. लिलाव आयोजित करण्यात आला त्याची माहिती बऱ्याच लोकांना देण्यात आली नव्हती केवळ मोजक्या दोन पेपरमध्ये या संदर्भाची जाहिरात छापून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांच्याकडून यामध्ये मोठ्या गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भामध्ये संपर्क केला असता आमच्या मध्ये वाद झाला पण ते आपसात मिटवल्या गेला असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

