नांदेड| जिल्हाभर सुरू असलेला अवैध रेती उपसा व वाहतूक महसूल विभागाला थांबवता आला नसला तरी याविरोधात कार्यवाहीच्या प्रयत्नात सदर विभाग नेहमीच राहिलेले आहे. आता या मोहिमेत महिला महसूल अधिकारी सुद्धा मैदानात उतरून धाडसी कार्यवाही करत असल्याचे चित्र रविवार (ता.३) रोजीच्या पहाटेच्या सुमारास महिला मंडळ अधिकारी रुपाली जडे यांनी केलेल्या कार्यवाहीच्या माध्यमातून अधोरेखित झाले आहे.
अवैध रेती उपसा व वाहतूक महसूल विभागासाठी डोकेदुखी असली तरी महसूल विभागातील अनेक अधिकारी प्राण पणाला लावून याविरोधात कार्यवाही करत आले आहेत. मात्र आता या रेती माफीयाच्या विरोधात महसूल विभागाच्या महिला अधिकारी सुद्धा मैदानात उतरून धाडसी कार्यवाही करत असल्याचे चित्र रविवार (ता.३) रोजी अधोरेखित झाले आहे. मुदखेड तालुक्यातील वासरी येथे अवैध रेती वाहतूक सुरु असल्याची माहिती मंडळ अधिकारी रुपाली जडे यांना मिळाली.
दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, भोकर उपविभागीय अधिकारी सचिन यादव, प्रभारी तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळ अधिकारी रुपाली जडे यांनी रविवारी (ता.३) पहाटे चार वाजेच्या दरम्यान खाजगी वाहनाने वासरी येथील घटना स्थळी जाऊन, रेती वाहतूक करत असलेले दोन ट्रक रोखून ते जप्त करण्याची धाडसी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत रुपाली जडे यांच्या सोबतच्या पथकात, बालाजी फुव्हाडे, कोइरवार व तलाठी अंजली बार्शीकर यांच्या समावेश होता.