हिमायतनगर, अनिल मादसवार । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता गाव पातळीवर येऊन पोहचला असून, जवळपास सर्वच ग्रामीण खेडे, शहरात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आंदोलनाची धग कायम असतानाच भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर हे हिमायतनगर शहरात आले असतांना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला.
आंदोलकांनी चाभरेकर यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गाडीच्या बायनाट वर दगड लागल्याने किरकोळ गाडीचे नुकसान झाले असून, पुढील अनर्थ टळला. या घटनेतून मार्ग काढीत चाभरेकर भितीदायक वातावरणात शहराबाहेर पडले.
ता. २७ शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान भारत राष्ट्र समितीचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर हे हिमायतनगर शहरातील काही ठिकाणी सांत्वनपर भेटी देण्यासाठी आले होते असे सांगण्यात आले. शहरातील चौपाटी भागात मराठा आंदोलकांनी चाभरेकर यांच्या गाडीला घेराव घातला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अश्या घोषणा देत आंदोलकांनी गाडीच्या बायनटवर दगड मारला.
या मध्ये गाडीचे किरकोळ नुकसान झाले. शहरातील शांतता प्रिय नागरिकांनी परिस्थिती हाताबाहेर जावू न देता चाभरेकर यांची गाडी आंदोलकांच्या गराड्यातून बाहेर काढली. सध्या शहरात शांतता असून आंदोलन चालू आहे. अंतरवली, सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हिमायतनगर शहरांसह गावा गावात मराठा समाज आंदोलन करीत असून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली जात आहे. उद्यापासून हिमायतनगर शहरातील बसस्थानक मैदानात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु केले जाणार असून, याची तयारी पूर्ण झाली असून, जास्तीस्त जास्त मराठा समाज बांधवानी यात सहभाग घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.