हिमायतनगर| तालुक्यातील जवळगाव ते कामारी सबस्टेशनअंतर्गत फीडरचे मंजूर काम गेल्या काही महिण्यापासून बंद आहे. हे काम सुरू न केल्यास ६ नोव्हेंबरपासून अमरण उपोषणास बसण्याचे निवेदन कार्यकारी अभियंता भोकर यांना ग्रामस्थांनी दिले आहेत. मात्र या कामाला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळी पर्वकाळात आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. आजपासून तालुक्यातील मौजे जवळगाव येथील सबस्टेशन येथे अमरण उपोषणास शेतकरी बसणार आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे एक दोन वर्षांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कामारी येथे वीज अर्धा तासही टिकत नाही. कामारी, पिंपरी, कामारवाडी, पंजाबनगर एवढी गावे एकाच फीडरवर आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने लाइट टिकत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱयांना ऊस लागवडीच्या काळात वीज मिळत नसल्याने मोठ्या नुकसानीचा समान करावा लागतो आहे. याबाबत महावितरणने ठोस पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा द्यावा अशी मागणी एका निवेदना द्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.
कामारी, पिंपरी या दोन गावांसाठी नवीन फीडर व्हावे आणि शेतकऱ्यांची कायमची समस्या सुटावी यासाठी आमदार माधवराव जवळगावकर यांनी सात महिन्यांपूर्वी १५ लाख निधी मंजूर करून आणला आहे. ते काम करण्यास महावितरण व ठेकेदार कमी पडत आहेत. यासाठी शेतकरी नागरिकांनी पाठपुरावा करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता अमरण उपोषणास बसत असल्याचे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जोगद्र नरवाडे, पांडुरंग शिरफुले, रमेश शिरफुले, अमोल शिरफुले यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.