पाकिस्तान व चीन यांसह भारतात असणार्या अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ
मुंबई| अंतर्गत शत्रूंमुळे अनेक देशांची हानी झाली आहे. विविध युद्धसाहित्य असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे ‘सोव्हिएत युनियन’चे अनेक देश होताना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत. भारताच्या विरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ चालू आहे, ज्यात काही देशविरोधी राजकीय पक्ष, शिक्षणसंस्था, वकील, पत्रकार यांचा समूह कार्यरत आहे. कोणताही देश बाहेरील शत्रूंमुळे नव्हे, तर अंतर्गत शत्रूंमुळे कोसळतो. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूंसह भारतात असणार्या अंतर्गत शत्रूंचाही आपल्याला विचार करावा लागेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील संरक्षणतज्ञ आणि ‘भारत के अंदरूनी शत्रु’ या पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारताचे अंतर्गत शत्रू कोण ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
या वेळी कर्नल सिंह पुढे म्हणाले की, आमची लढाई केवळ पाकिस्तानशी नसून तेथे उत्पन्न झालेल्या ‘जिहाद’शी आहे. या जिहादला पाठिंबा देणारे आणि मदत करणारे लोक, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’, त्यांचे माओवादी, तसेच ज्यांचे येथील चर्चशी सलोख्याचे संबंध आहेत, अशांसह अनेक भारतविरोधी घटकांशी आपल्याला लढावे लागत आहेत. जगभरात अनेक देश तेथील पंथीय किंवा धार्मिक बहुसंख्याकांच्या आधारावर बनले आहेत. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान देश मुसलमानांना दिला गेला. कुठल्याही युद्धात पंथ किंवा धर्म यांची मोठी भूमिका असते. इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आता चालू असलेल्या युद्धातूनही ते दिसून येईल.
देशातील बहुसंख्य समाज जेव्हा विखुरतो, तेव्हा राष्ट्रनिर्माण कसे होणार ? पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा नरसंहार झाला. आता तिथे उरलेल्या हिंदूंसाठी काय पर्याय आहे ? एक काळ होता, जेव्हा भारतात ‘सनातन धर्मी’ आणि ‘देशप्रेमी’ असणे, हा अभिशाप होता. आता काळ बदलला आहे. जे लोक तुमचे रक्षण करतात, त्यांना सन्मान द्या. जेव्हा तुम्ही धोक्यात असता, तेव्हा हिंदु संघटना तुम्हाला वाचवतात. कोणतीही सरकारी व्यवस्था तुमचे रक्षण करणार नाही. दिल्ली येथे दंगल झाली, तेव्हा कोणत्या सरकारी व्यवस्थेने हिंदूंना वाचविले होते का ? हिंदूंनी स्वतःविषयी अभिमान बाळगून आत्मविश्वासाने पुढे जायला हवे, मग विश्वातील कोणतीही शक्ती तुम्हाला कमीपणा दाखवणार नाही, असे आवाहनही कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी हिंदु समाजाला उद्देशून केले.
….श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)