मयत पतीच्या नावे असलेले राहते घर परस्पर इतरांच्या नावाने करणाऱ्या ग्रामसेवक व इतरांवर कारवाई करावी

नांदेड। शहरा लगत असलेल्या मौजे वाजेगांव ग्राम पंचायत मध्ये पंचशील नगर येथे उपोषणार्थी शांताबाई पांडुरंग गजभारे यांच्या पतिच्या नावाने असलेले राहते घर इतरांच्या नावाने केल्याचा संशय असल्यामुळे ते घर वारसा हक्काने माझ्या नावाने करावे.
माझे घर परस्पर इतरांच्या नावाने करणाऱ्या ग्रामसेवक व इतरांची चॊकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. वारसा हक्काने ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर माझ्या नावाची नोंदणी करावी. माझ्या नावाने घर टॅक्स पावती देण्यात यावी. मी दलित, विधवा असून माझे वय ७० वर्षे आहे, मला ग्रामपंचायत येथे खेटे मारण्यासाठी भाग पडणाऱ्या ग्रामसेवक व त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या घेऊन वयोवृद्ध शांताबाई गजभारे ह्या कडाक्याच्या थंडीत जिल्हा परिषदे समोर दि.१८ डिसेंबर पासून अमरण उपोषणास बसल्या आहेत. त्यांचे पती मयत पांडुरंग गजभारे यांचे निधन सहा वर्षांपूर्वी झाले असून त्या निराधार आहेत.
त्यांची दिशाभूल करून आणि कट कारस्थान रचून कुणीतरी त्यांचे राहते घर परस्पर इतरांच्या नावाने केल्याची त्यांना शंका आहे. ग्रामसेवक यांना घर टॅक्स पावती मागितली असता अवाढव्य रकमेची मागणी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पीडित वयोवृद्ध निराधार महिलेला न्याय मिळावा म्हणून काही पक्ष संघटना उपरोक्त उपोषणास पाठिंबा देत आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने देखील देण्यात येत आहेत.
पीडित महिलेच्या उपोषणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सिईओ ग्रामसेवक वाजेगांव यांच्यावर काय कारवाई करतील आणि काय निर्णय घेतील याकडे पीडित महिला व कुटुंबातील लोक आशेने पहात आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय उपोषनार्थिनी बोलून दाखविला आहे. उपोषणास दोन दिवस पूर्ण झाले असून उपोषणार्थिंची तब्येत खालवली आहे.
