Accident । हिमायतनगर- भोकर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला भरधाव वाहनाची धडक; एक ठार एक जखमी

हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर – भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम आबादी ते खडकी बा फाट्याच्या मध्ये असलेल्या शिवारात हिमायतनगर हुन सरसम कडे येणाऱ्या एका दुचाकी वाहनाला भरधाव वाहनाने जबर धडक देवून पलायन केल्याची घटना दि २ मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीवर स्वार एकजण जागीच ठार झालातर एकजण गंभीर जखमी आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील सरसम आबादी येथील रहिवासी अनिल दिगांबर कदम(उर्फ पिंटू) वय ३० वर्ष व शिवाजी सुभाष कदम वय ३१ वर्ष हे दोघे जण कामानिमित्त हिमायतनगर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हिमायतनगर भोकर राष्ट्रीय मार्गाने परत सरसम बु गावाकडे दुचाकी क्रं.एम एच २६ बी एफ २८६९ वरून येत होते. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला जबर धडक देवून घटनास्थळ वरुन वाहनासह चालक फरार झाला आहे
घटना एवढी जबर होती की, दुचाकीचालक सिमेंट कोंकरेटच्या रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पडून जागीच गतप्राण झाला आहे. मयत हा हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम आबादी इंदिरानगर येथील अनिल दिगांबर कदम असून, शिवाजी सुभाष कदम हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सरसम येथिल प्राथमिक रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती काही नागरिकांनी हिमायतनगर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि अपघात स्थळाचा पंचनामा करून फरार झालेल्या वाहनांच्या शोधात आहेत. तर युवकचा मृतदेह हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून, अपघात प्रकरणी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
