नांदेड। दिवाळीपूर्वी शेतकर्यांना पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कमेसह अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनीची व येलो मोझ्याक अळीमुळे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरुच असून लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल,नांदेडसह धुळे, हिंगोली, लातूर या जिल्ह्यातील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून विमा कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले असल्याने नुनकसान भरपाईचे लवकरच वितरण होणार असल्याची माहिती आ. राम पाटील रातोळीकर यांनी दिली.
शेतकर्यांना पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम मिळावी यासाठी आ. रातोळीकर यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,कृषीमंत्री धनजंय मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी काही दिवसांपूर्वीच तातडीची बैठक घेऊन 28 सप्टेंबर रोजी एका महिन्यात 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश काढले.ही अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मिळेलच शिवाय उर्वरित 75 टक्के रक्कम तातडीने मिळावी यासाठी शेतकर्यांनी वेळेत तक्रारी करणे गरजेचे असल्याचे सांगून विम्याची पुढील रक्कम मिळवून देण्यासाठीही जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील रहावे, असे आ. रातोळीकर यांनी केले आवाहन केले.
नांदेड जिल्ह्यातील खरडून गेलेल्या जमीनीसाठी शेतकर्यांना कोणतीही मदत वितरीत करण्यात आली नाही. अतिवृष्टी काळात नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शेकडो हेक्टर जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. इतर जिलल्ह्यात जाहीर झालेल्या मदतीप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनाही नुकसान भरपाई सुद्धा शासनाच्यावतीने लवकरच शेतकर्यांना मिळणार असल्याचे सांगून आ. राम पाटील म्हणाले, ज्या भागातील शेतकर्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही.
त्या भागात येलो मोझ्याकमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लोहा-कंधार,देगलूर तालुक्यातील शहापूर, खानापूर, नरंगल, किनवट तालुक्यातील इस्लापूर, जलधरा, शिवणी, भोकर तालुक्यातील किनी व इतर मंडळात येलो मोझ्याकमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरुच असल्याचे आ. रातोळीकर यांनी नमुद केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक
पीक विम्याची अग्रीम रक्कम देण्याबाबत विभागीय स्तरावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता विमा कंपन्यांच्या अधिकार्यांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी बैठक बोलावली असून या बैठकीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती आ. रातोळीकर यांनी दिली.