‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वतीने २०२३ च्या सर्व पुरस्कारांचे आज वितरण
नांदेड| मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे असणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.
सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये जीवन साधना गौरव, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संकुल व तरुण संशोधक शिक्षक तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पुरस्कार इत्यादी प्रशासकीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याशिवाय परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यार्थी विकास विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, क्रीडा विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार तसेच विद्यापीठ कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचाही गुणगौरव या कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे.