हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर – सरसम शिवारात गौण खनिज काळी रेतीची अवैध्यरित्या चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करण्यासाठी वाहतूक करताना हिमायतनगर पोलिसांनी एका ट्रैक्टरला रंगेहात पकडून कार्यवाही केली आहे. एककीकडे महसुलाचे अधिकारी कर्मचारी रेती तस्करांना अभय देत असताना पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उगारल्याने संबंधित सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिमायतनगर तालुक्यात मागील २ वर्षांपासून सुरु असलेल्या या गौण खनिज चोरीच्या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष केंद्रित करून गोरगरिबांची होणारी लुबाडणूक थांबवावी. आणि शासनाचा अल्प दरातील रेती डेपो हिमायतनगर तालुक्यात सुरु करून घरकुल धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय आणि खाजगी बांधकामे सुरु आहेत. यासाठी रेती व मुरूमाची आवश्यकता असल्याने नदी, नाल्याच्या काठावर असलेल्या रेती घाटावरून महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही ट्रैक्टर चालक, मालक यांनी रेती विक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु केला आहे. एव्हडेच नाहीतर नदीकाठच्या काही गावात मोठ्या प्रमाणात रेतीची साठेबाजी करून गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून शासनाचा महसूल बुडवीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक शासनाच्या रेती डेपोच्या ददुर्लक्षित धोरणामुळे नाईलाजास्तव काळ्याबाजारातून रेती खरेदी करून घरकुलाचे काम करत आहेत. यामुळे सर्वात जास्तीचा पैसा केवळ रेती खरेदीवर होत असल्याने बहुतांश घरकुलाचे कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. अश्याच प्रकारे गौण खनिजाची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना हिमायतनगरचे पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गंगाधरराव नागरगोजे यांनी शेख निसार शेख बाबू रा. सरसम आबादी हिमायतनगर यास राष्ट्रीय महामार्गावरून विनापरवाना रेतीची वाहतूक करताना दि. ०७ ऑकटोबरच्या रात्री १०.३० वाजता रंगेहात पकडले आहे. पोलिसांना पाहताच त्याने वाहन जाग्यावर सोडून धूम ठोकली असल्याने त्याच्यावर कलम 379 भादवी व कलम 4, 21 गौण खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर किनवट हायवे रोडवर असलेल्या खडकी बा. पाटीजवळील मसोबा नाल्याच्या जवळ सरसम शिवारात रेतीची चोरी करून एका निळ्या हेडर ट्रॅक्टर व लाल ट्रॉली असलेल्या वाहनातून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी १०. ३० वाजता महसूल उत्खननाची कोणतीही रॉयल्टी व परवानगी नसताना भरधाव वेगात वाहन चालूंन रेतीची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस आल्याचे लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली , मात्र ०१ लाख ५० हजार रुपये किंमतिचे वाहन त्यात एक ब्रास काळी रेती अस मिळून अंदाजे 2 लक्ष 4 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरील ट्रॅक्टर मुद्देमालासह हिमायतनगर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे. सदरील आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर मधून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने काळी रेती भरून वाहतूक करीत असताना मिळून आला आणि पोलीस दिसतात वाहन सोडून पळून गेला. अशी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रेती चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बि. डी. भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कदम हे करत आहेत.
सध्या तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे नाल्यातील पाण्याचे स्रोत कमी होऊन रेती वर आली आहे. या संधीचा फायदा घेऊन रेती तस्कर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करून गरजूना आवाच्या सव्वा दराने विकून मालामाल होण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील एका रेती घाटात लिलाव झाला नसल्यामुळे हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त असलेल्या काही ट्रॅक्टर चालक मालकांनी तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून रेती चोरीचा गोरख धंदा चालविला आहे. या धंद्याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या रेतीच्या गोरखधंद्याला अंकुश लावावा. आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवले त्या ठिकाणी धाडी मारून शासनाच्या महसुलात वाढ करावी. तसेच जप्त केलेल्या रेतीतून आणि साठेबाजीतून शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार अल्प दरातील रेती डेपो विक्रीचे स्टोल सुरु करून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतुन केली जात आहे.