नांदेड। मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला घराकडे आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.
घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते. घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.
पोलीस ही माणूसच आहे.. त्यांच्या अडी अडचणी वरिष्ठांकडून पाहिल्या जात नाही…तरी वरिष्ठ पातळीवर हा विचार करणे आवश्यक आहे.. कृपया कोणत्याही कर्मचाऱ्यावर अशी वेळ येणार नाही अशा स्वरूपाचे नियोजन करणे आवश्यक आहे… पोलीस व पोलीस अधिकारी नेहमीच तणाव ग्रस्त असतात तरी कृपया गृहमंत्रालयाच्या माध्यमातून या घटनेची चौकशी करुन मृतकर्मचारी यांच्या वारसांना योग्य न्याय द्यावा.
अनेक वर्षांपासून पोलीस अधिकारी प्रचंड तणावात काम करत आहेत आणि अशा घटनांत वाढ होताना दिसतेय. खरंतर पोलिसांना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावत असतात त्यात सुधारणा करण्यासाठी अनेक पोलीस कमिशन्स नेमले गेले पण अद्याप त्यावर अंमलबजावणी झालीच नाही. पोलीस यंत्रणेत ब्रिटिश मानसिकता अंगभूत आहे, त्यामुळे अजून सुद्धा तिला स्वतःला बदलता येत नाही. त्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने अजून परिस्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोलीस यंत्रणा सीबीआयच्या धर्तीवर सरकारच्या दैनंदिन हस्तक्षेपापासून स्वतंत्र केली पाहिजे अशी मागणी होत आलेली आहे. पोलीस अत्याचाराच्या विरोधात मानवी हक्क आयोग दखल घेतो मात्र प्रामाणिक पोलिसांची जी होरपळ होतेय त्यावर सुद्धा मानवी हक्क आयोगाने न्याय उपाय लवकरात लवकरात शोधायला हवा अन्यथा अशा घटनांत वाढ होण्याचा धोका आहेच. कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी घडवण्यासाठी शासनाचा पर्यायाने जनतेचा प्रचंड पैसा अनेकांची मेहनत आणि वेळ दिला गेलेला असतो. त्यामुळे पोलीस यंत्रणेने, शासनाने तसेच समाजाने याकडे संवेदनशीलतेने जबाबदारी स्वीकारून समाधान शोधायला हवे. आणि ते आपल्या सर्वांच्या – पोलिसांच्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी करायलाच हवे.