किनवट/शिवणी, प्रकाश कार्लेवाड। डोक्यावर कर्जाचे डोंगर सततची ना पिकी व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती खरडून पिकाचे व शेतीचे उध्वस्त झाल्याने या सर्व गोष्टींना कंटाळून ३२ वर्षीय तरुण शेतकरी सुधाकर मांगीलाल चव्हाण या तरुण शेतकऱ्यांने काल दि.४ ऑक्टोबर बुधवार रोजीच्या मध्यरात्री तांड्यातील एका गोठ्यात नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा तांडा येथे घडली.या संबंधी पोलीस ठाणे इस्लापुर व महसूल प्रशासनास कळविण्यात आले असून, सपोनि उमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि टी. पी.कोरके,पोलीस अमलदार संदीप सावळे,पोलीस शिपाई नारायण पांचाळ,अर्जुन साखरे यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेचे इस्लापुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर शव विच्छेदनासाठी प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे नेण्यात आले.या घटने मुळे परिसरातील तांड्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नष्ट झालेले पीक, खरडून गेलेल्या शेती,आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर जणू हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुंजलेल आहे असे दिसून येत आहे. मागील काही दिवसात या सर्व जाचाला कंटाळून पांगरपहाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना नुकतीच ताजी असतांना शिवणी परिसरातील दयाळ धानोरा येथील ही दुसरी घटना उघडकिस आली आहे. यामुळे संपूर्ण वाडीतांड्यात शोककळा पसरली आहे.
वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती ढासळत असल्याचे यातून दिसत आहे.जुलै महिन्यातील २० जुलै ते २८ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवणी परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.तर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना शासनाने आजपर्यंत काहीच मदत केली नाही.नाल्यालागत असलेल्या शेतीमध्ये पुराचे पाणी घुसून शेतीमधील उभे पिक व शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या.यात होत ते नव्हतं झालं. तेंव्हापासून सदरील शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत होता.असे परिवारातील सदस्यांकडून व तांड्यात बोलले जात आहे.
याचे प्रत्यक्ष प्रमाण दयाळ धानोराच्या तांड्या लागत असलेल्या शेत सर्व्ह नं ११९ यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा शेती हिस्सा असलेल्या डीक अवस्थेतवरून दिसून येत आहे. तर अतिवृष्टी दरम्यान किनवट तालुक्याचे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी या शेताची पाहणी बांधावर जाऊन केले होते. अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याने पीक व शेती खरडून गेल्यामुळे शेतात पीक नाही,जवळ पैसे नाही, परिवाराचा गाडा कसे चालवायचा कसा ? या विवंचनेत असलेला तरुण शेतकरी अखेर गळ्याला गळफास लावून घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
परिवारात वृद्ध आई,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार असून या परिवाराचा संसाराचा गाडा हकालणारा प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे परिवार उघड्यावर आले आहे.या मुळे सरकार मायबाप आपण नुकसान भरपाई व आत्महत्या ग्रस्त परिवार म्हणून आर्थिक मदत तात्काळ द्यावे. अशी मागणी परिवाराकडून व शेतकरी वर्गातून होत आहे.सदरील घटनेची इस्लापुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करणयात आली असून प्रार्थमिक आरोग्य केंद्र शिवणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.साईप्रसाद राठोड,डॉ.शिवानी राठोड यांनी शव विच्छेदन केले. पोलीस प्रशासणाच्या माध्यमातून परिवारास शव सुपूर्द केले.पुढील तपास सपोउनि अंकुश लुंगारे,हवालदार संदीप सावळे हे करीत आहेत.