आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासासह गावाच्या सक्षमीकरणासाठी एकजुटीने काम करा – मिनल करनवाल
नांदेड| आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासासह गावाच्या सक्षमीकरणासाठी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियानांतर्गत आज शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, नेहाताई जवळगावकर, गटविकास अधिकारी एस. एम. मांजरमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानात निकषानुसार हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव व भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलीआहे. जवळगाव येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.
पुढे त्या म्हणाल्या, भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी गाव आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व कुटुंबांना पक्के घरे, घर तिथे शौचालय, सर्व घरांना नळ जोडणी, रस्ते, रोजगार, बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी लघुउद्योग, जैविक शेती तसेच सौर ऊर्जेचा वापर आदी बाबी गाव स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी सरपंच प्रतिनिधी निलेश पाटील जवळगावकर, उपसरपंच सुभाष माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोहरे, उपअभियंता सतीश हिरप, विस्तार अधिकारी प्रमोद टारपे, आरोग्य विस्तार अधिकारी फटिंग, ग्रामसेवक आनंद कदम यांच्यासह ग्राम पंचायतीचे सदस्य, गावकरी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बचत गटांनी उभारलेल्या मिनी दाल मिलला भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच गृहभेटी करुन महिलांशी त्यांनी हितगुज केली. त्यानंतर शेतीच्या बांधावर जाऊन शेतकरी महिलांशी बांधावर बसून संवाद साधला.