नांदेड। जुलै महिन्यात झालेल्या पुराच्या नुकसान भरपाई साठी सीटू कामगार संघटना व जनवादी महिला संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत साखळी अमरण उपोषण सुरु आहे.दि.१६ फेब्रुवारी रोजी साखळी उपोषणास ११२ दिवस पूर्ण होत आहेत. त्या साखळी उपोषणात सीटूचे सभासद कॉ.रामदास प्रसराम लोखंडे हे कमीअधिक प्रमाणात सातत्याने सामील आहेत आणि पूरग्रस्तांसाठी मंजूर झालेले सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून ते प्रयत्नशील होते.
त्यांनी ३ ऑगस्ट रोजी रीतसर अर्ज करून महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे रेशन किट व नुकसान भरपाई पोटी मिळणारी आर्थिक मदत करावी म्हणून मागणी केली होती. दि.५ सप्टेंबर रोजी बँक पासबुक आणि आधार कार्ड त्यांनी महापालिकेत सादर केले आहे. त्या दोन्हीही तारखेला अर्ज सादर केलेल्या पोचपावत्या उपलब्ध आहेत. नांदेड शहरातील हजारो बोगस पूरग्रस्तांना चिरीमिरी घेऊन लाभ देण्यात आला परंतु खऱ्या आणि गरजू पूरग्रस्तांना डावलल्याने लोखंडे खचून गेले होते. त्यांनी दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदन देऊन प्रणातिक उपोषण करण्याची नोटीस दिली आहे.
सीटू आणि जमसंच्या दिनांक १२ जानेवारी पासून सुरु असलेल्या साखळी उपोषणातील मागण्या सोडवाव्यात तसेच मनपातील गुंठेवारी व बांधकाम परवानगी, सीसीटीव्ही कॅमेरा घोटाळा,दिवाबती घोटाळा,पदोन्नती घोटाळा,बोगस पावती घोटाळा,वसुली अधिकारी व तलाठ्यांनी संगणमताने केलेला पूरग्रस्तांच्या निधीतील घोटाळ्यातील दोषींना सेवेतून कायमचे बडतर्फ करून अपहराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी. आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीआयडी आणि विभागीय चौकशी करावी या प्रमुख मागण्यासह विविध मागण्यासाठी प्राणातिक उपोषण करण्याचे शासनास कळविले होते. त्यांच्या मागण्याची अद्याप दखल घेण्यात आली नसून दुर्दैवाने उपोषणाची नोटीस देणाऱ्या रामदास लोखंडे यांचा दिनांक १६ फेब्रुवारी सकाळी एक च्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
उपोषणास हलक्यात घेणाऱ्या प्रशासनास आता मात्र ठोस कारवाई करावी लागेल तसेच मयत लोखंडे यांच्या कुटुंबीयांचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे लागेल.अशी मागणी समाजातील लोकांडून पुढे येत आहे. तसेच मयत लोखंडे यांच्या कुटूंबातील सदस्यांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागील देखील करण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यात मातंग समाज हा सात टक्के असून विविध संघटनेचे पदाधिकारी वरील मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. दि.१६ फेब्रुवारी रोजी सीटू आणि जमसंच्या आंदोलनास ११२ दिवस पूर्ण होत असून जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुपारी १२ वाजता तीव्र निदर्शने करण्याचा इशारा सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात प्रशासनास लेखी इशारा दिला होता.परंतु एका कार्यकर्त्यांचा किंबहुना उपोषणार्थिंचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सदरील निदर्शने रद्द करण्यात आली आहेत.
नांदेड मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या नावाचा मयत उपोषणार्थीच्या निवेदनात सुस्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मयताच्या मागण्याची दखल जोपर्यंत घेण्यात येणार नाही तोपर्यंत पार्थिव महापालिके समोरून हलवीणार नसल्याची भूमिका नातेवाईकांची व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी तातडीने मागण्या सोडवाव्यात व पीडित दलित कुटूंबातील सदस्यांचे शहरात पुनर्वसन करावे आणि त्यांच्या मुलास महापालिकेत नोकरी देण्यात यावी.ह्या मागण्या करण्यात येत आहेत.
मयत रामदास प्रसराम लोखंडे हे कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या बहिणीचे पती होत आणि सीटू कामगार संघटनेचे सभासद असल्यामुळे नांदेड सीटू कामगार संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.