भोकर। जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथील वकील संघासाठी पार पडलेल्या अतीशय चुरशीच्या लढतीत नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी ॲड.संदीप कुंभेकर, उपाध्यक्षपदी मंगेश कुमार पेदे तर सचिव पदी प्रदीप लोखंडे हे विजयी झाले आहेत.
ॲड संदीप कुंभेकर व ॲड एस एन कादरी यांना समान मते मिळाल्यामुळे नाणेफेक करून प्रत्येकी एक वर्ष विभागून अध्यक्ष पद भूषविण्याची संधी देण्यात आली आहे. नाणेफेकीत जिंकल्याने प्रथम वर्षी संदीप कुंभेकर यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदासाठी ॲड. मंगेश पेदे यांना पसंती दर्शविली आहे .
भोकर वकील संघाच्या कार्यकारिणीचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे नुतन कार्यकारणीसाठी निवडणूक प्रक्रिया पार अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . सदर निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञांकडून प्रयत्न करण्यात आले. शेवटी येथील विधी सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याने निवडणूक घोषित करण्यात आली होती.
सदर निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उपाध्यक्ष पदासाठी २, सचिव पदासाठी ४, तर कोषाध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या ॲड. परमेश्वर पांचाळ, ॲड.संदीप कुंभेकर, ॲड.एस एन कादरी, यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे मागील आठ दिवसापासून न्यायालय परिसराला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
संघाच्या एकुण ६८ सदस्यापैकी ६६ सदस्यांनी मतदान केले.अध्यक्ष पदासाठी ॲड. संदीप कुंभेकर, ॲड.सय्यद एस.एन कादरी यांना २५ – २५ अशी समान मते पडली तर प्रतिस्पर्धी ॲड. परमेश्वर पांचाळ यांना १६ मते मिळाली , उपाध्यक्ष पदासाठी ॲड. मंगेश पेदे यांना ४०मते तर ॲड.लक्ष्मीकांत मोरे यांना २६ मते, सचिव पदासाठी ॲड.प्रदिप लोखंडे यांना २६, ॲड. के जे राठोड यांना १५, आणि ॲड.पवन वच्छेवार यांना १६ तर ॲड संतोष पवार यांना ९ मते मिळाली. कोषाध्यक्ष पदासाठी ॲड. विशाल दंडवे यांना ४३ तर ॲड. भानुप्रसाद सूर्यवंशी यांना १४, ऍड.पाटील हर्षवर्धन यांना ९ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या एडवोकेट एस. एन.कादरी आणि एडवोकेट संदीप कुंभेकर यांना समान मते पडल्यामुळे प्रत्येकी एक एक वर्ष अध्यक्ष पद भूषविण्याची संधी देण्यात आली. नाणेफेक जिंकून एडवोकेट कुंभेकर यांना द्विवार्षिक कार्यकाळातील प्रथम वर्षी अध्यक्षपदाची संधी मिळाली .
दरम्यान सहसचिव पदा करिता ऍड. प्रकाश मेंडके,विशिष्ट सहायक पदाकरीता अॅड. देशपांडे निखील ,महिला प्रतिनिधी पदा करीता अॅड. सुजाता कांबळे या तिघाची बिनविरोध निवड झाल्याने पुर्वीच निवडणुक निर्णय अधिकारी यांनी घोषीत करून त्यांचे अभिनंदन केले . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. ऍड एस. एस. कुंटे तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. सिध्दार्थ कदम यांनी काम पाहिले. सय्यद आबेद यांनी परिश्रम घेतले.या निवडीचे अनेकांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या .