प्रेम विवाह करतांना रक्ताच्या नात्यातील साक्ष अनिवार्य करावी म्हणून आमरण उपोषण सुरू

नांदेड। आंतरजातीय विवाह पद्धतीमध्ये प्रेम विवाह करताना रक्ताच्या नात्यातील सदस्यांची साक्ष असल्याशिवाय हा विवाह ग्राह्य धरू नये यासाठी सिडको हडको कृती समितीच्या वतीने वैजनाथ ईश्र्वरराव देशमुख यांच्यासह सौ.ज्योती संदीप कदम, धीरज नीलकंठ स्वामी, अभिषेक नामदेवराव जोशी, प्रमोद प्रभाकर रेवनवार, संजय रामराव चाकूरकर आदींनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
सामाजिक जीवनामध्ये आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात होत असून मुलगी अठरा वर्षाची व मुलगा 21 वर्षाचा झाल्यास त्यांच्या विवाहाला कोर्टामध्ये सहजरीत्या मान्यता मिळत आहे. यामुळे अज्ञान असलेल्या अठरा वर्षाच्या मुलीला कुठलीही समज नसल्याकारणाने ती भावनेच्या भरात संबंधित मुलासोबत विवाह करीत आहे.
परिणामी त्यामुळे आई-वडिलांना असाह्य वेदना होत असून त्यामुळे समाजात खुनाच्या व आत्महत्येच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून रक्ताच्या नात्यातील साक्ष असल्याशिवाय त्या प्रेम मिळाला कोर्टाने मान्यता देऊ नये यासाठी सिडको हडको कृती समिती तर्फे अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे आज 14 फेब्रुवारी या आंतरराष्ट्रीय प्रेम दिवशी वैजनाथ देशमुख यांच्यासहसौ. ज्योतीताई कदम, धीरज स्वामी,अभिषेक जोशी प्रमोद रेवणवार,संजय चाकूरकर आदींनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सदरील उपोषणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, उपोषणस्थळी नांदेड भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्य देशमुख,माजी नगरसेवक संजय इंगेवाड,सिध्दार्थ गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र गायकवाड,पंजाबराव काळे, सदाशिवराव कदम,राजू लांडगे, सिद्धार्थ गायकवाड, सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका, राजन जोजारे, सतीश बेलूरकर, अनिलसिंह हजारी, प्रा.मधुकर गायकवाड, सुधीर बिडवाई, दिगंबर शिंदे, जितूसिंग टाक, गौतम पवार, आदी सह अनेकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दिला.
