आपापसांतील वैरभाव संपुष्टात आणून एकीचे बळ वाढवा
नांदेड| आपण आपल्यातील अहं सोडून द्यायला हवा, मी मोठा तो लहान अशी श्रेष्ठ कनिष्ठतेची श्रेणी त्यागायला हवी, मान सन्मान बाजूला ठेवावेत तसेच आपापसांतील वैरभाव संपुष्टात आणून एकीचे बळ वाढविले पाहिजे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी तालुक्यातील तळणी येथील पहिल्या बौद्ध धम्म परिषदेत केले.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे आगमन तळणी येथे झाल्यानंतर धम्मदेसना देतांना भदंत पंय्याबोधी थेरो यांनी मार्गदर्शन केले. बौद्ध धम्म परिषदेत ध्वजारोहण, ग्रंथवाचन, भोजनदान, धम्मदेसना तसेच माधव वाढवे, विजय सातोरे, काजल सातोरे यांच्या बुद्ध भीम गीत गायन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
तालुक्यातील तळणी येथे समस्त बौद्ध उपासक उपासिका यांनी पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ध्वजारोहण व ग्रंथवाचन संपन्न झाले. दुपारी सर्व उपस्थितांना भोजनदान देण्यात आले. भिक्खू संघाच्या आगमनानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. धम्मदेसना देतांना भदंत पंय्याबोधी थेरो पुढे म्हणाले की, सद्याचा काळ बौद्धांच्या राजकीय भविष्यासाठी खडतर आहे. त्यासाठी आपण सर्वच एक होणे काळाची गरज आहे. ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेच्या निमित्ताने सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र आले होते. आपण आता एकत्र येऊन एकतेचे सौंदर्य स्थापित केले पाहिजे, ह्यातच आपले भले आहे.