
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील मौजे दहीकळंबा येथील एका शेतात विहिरीचे बांधकाम सुरू होते पूर्ण झालेले बांधकामाची भिंत ढासळून मजूरदाराच्या अंगावर कोसळून जागीच मजूरदार ठार झाला तर शेतकरी जखमी झाल्याची घटना दिनांक २५ मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
दहीकळंबा ता.कंधार येथील शेतकरी साहेबराव माणिका शिंदे यांची गट क्रमांक १४१-४२ मध्ये शेती असून विहीर बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. सदरील विहिरीचे बांधकाम हे अंतिम टप्यात आलेले होते , दिनांक २५ मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सदरील शेत मालकाचे वडील माणिक माधवराव शिंदे वय वर्षे ( ५० ) हे व मजूरदार अनिल शंकर राठोड वय वर्षे (४०) राहणार गोविंद तांडा ता. लोहा व अन्य एक जन असे विहीर बांधकामावर पाणी टाकत होते .
पाणी टाकत असताना सदरील विहिरीचे बांधकाम ढासळून माणिक शिंदे व अनिल राठोड हे विहिरीत कोसळले त्यात अनिल राठोड यांच्यावर विहिरीचे बांधकाम कोसळल्याने ते विहिरीतच ढिगाऱ्याखाली अडकून पडून त्यांचा मृत्यू झाला तर माणिक शिंदे यांना इतर साथीदाराने कसेबसे विहिरीच्या वर काढले त्यात ते जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
तर विहिरीत पाणी जास्त असल्याने तीन मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम सुरू होते. त्यामुळें मजुराचा मृतदेह पाण्यातच होता. घटनास्थळी उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गाडेकर व त्यांचे सहकारी दाखल झाले होते. विहिरीत पाणी जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरू होते तर अद्याप बातमी वार्तांकन करे पर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. मयत अनिल राठोड हे घरचे कर्ते पुरुष होते ते मजुरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुली,एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
