
नांदेड। हदगांव तालुक्यातील अंबाळा तसेच,अन्य सर्वच वनजमिनीतील गौणखनीज उत्खनन तातडीने थांबवून सदरच्या नियमबाह्य उत्खननाची मोजणी करुनच वरिष्ठांकडून त्रिसदस्यीय समिती नियुक्त करुन चौकशी करावी व दोषी संबंधितांसह त्यांची पाठराखण करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके हदगांव तसेच, स्थानिक वनपाल,वनरक्षक त्याचबरोबर,त्यांच्याशी संगनमत साधून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच उपवनसंरक्षक केशव वाबळे आदींना शासकीय सेवेतून बडतर्फी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या भारतीय प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी अंबाळा ता.हदगांव येथिल सदरच्या वनजमिन उत्खनन स्थळीच बेमुदत उपोषण करणार असल्याचा ईशारा राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांच्यासह संबधितांना पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्त्या रजनी मेडपल्लेवार यांनी निवेदनातून दिला आहे.
हदगांव तालुक्यातील वनजमिनीमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या गौणखनिज उत्खनन व वहातूकीवर तातडीने निर्बंध आणून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असतांना व वृत्तपत्रांतून पुराव्यानिशी सविस्तर वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी संबंधित दोषींसह त्यांची पाठराखण करणारेविरुद्ध कारवाई करणे अत्यावश्यक होते. परंतू,तसे करण्यात आलेले नाही.
त्यामूळेच आज दिनांक १८ रोजी अंबाळा येथील वनजमिनीत जेसीबीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून वहातूक करतांना दिसून आल्याने या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यक असून अंबाळा तसेच, हदगांव तालुक्यातील सर्वच गेल्या दोन वर्षातील वनजमिनीच्या उत्खनन प्रकरणाची चौकशीसाठी समिती गठीत करण्यात यावी व याबाबत संबंधित दोषींसह त्यांची पाठराखण करणारेविरुद्ध शासकीय सेवेतून बडतर्फी तसेच,त्यांनी कर्तत्वात कसूर करित स्वतःच्या आर्थिक हितासाठी वनजमिन,वनसंपदा नष्ट करुन शासनाची,कर्तव्याची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून कायदेशीर कारवाई असेही निवेदनात नमूद करतांनाच सदरील प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाहीमार्गाने येत्या भारतीय प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी अंबाळा, ता. हदगांव जि.नांदेड येथिल उत्खनन करण्यात आलेल्या वनजमिनीच्या ठिकाणीच बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे व सदरील तक्रार पुराव्यानिशी सादर करित आहेत
त्यानंतर व उपोषणादरम्यान सुडबूद्धीने मी व माझ्या कुटूंबातील व्यक्तीवर विनाकारण बनावट साक्षीदार तयार करुन एखाद्या पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे नोंदवने किंवा दडपण,धमक्या देऊन आमच्या जीवीत्वाशी धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त करुन तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रकरणातील दोषी व त्यांच्याशी संगनमत असलेले वनविभागाचे उपवनसंरक्षक,वनपरिक्षेत्र अधिकारी हदगांव (प्रा) व स्थानिक वनपाल, वनरक्षक, वनमजूर जबाबदार असतील अशीही बाब पूर्वसूचना म्हणून निवेनातून रजनी मेडपल्लेवार यांनी नमूद केली आहे.
वनजमिनीतून गौणखनिज उत्खनन नाही – वनपरिक्षेत्र अधिकारी
महत्वाचे म्हणजे कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून आपणांस प्राप्त माहितीवरुन अंबाळा येथे वनजमिनीतून गौणखनिज उत्खनन होतच नसल्याचा दावा हदगांवचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना दिला परंतू,घटनास्थळी आपण स्वतः अद्याप पहाणी केली नसल्याचे सांगून यासह हदगांव तालुक्यातील अन्य वनजमिनीतून झालेल्या गौणखनिज उत्खननांच्या वाढत्या तक्रारीवरुन स्थळपहाणी चौकशी,तपासणी व दोषींविरुद्ध ठोस कार्यवाहीबाबत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
सोशल मिडीया वा वृत्तपत्रांतून बातमी मगच वनविभागाला जाग !
नांदेड जिल्ह्यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात दर्जाहिन कामे,अवैध वृक्षतोड व वहातूक असो वा या विभागातील गैरव्यवहार, अनियमितता याबाबत सोशल मिडीया, वृत्तपत्रांतून बातमी आल्यानंतरच या विभागाच्या वरिष्ठांना जाग येत असल्याचा अनेकदा स्पष्ट झालेले असून त्यानंतरच चौकशी व कारवाईचा फार्स चालविला जातो आणि काही कालावधीतच कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करुन पूनश्च येरे माझ्या मागल्याची परिस्थिती असल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्याने यावरुन नांदेडच्या कांही वरिष्ठांशी या जिल्ह्यातील निवडक अधिकारी-कर्मचारीच नव्हे तर,दोषींचेही थेट आर्थिक लांगेबांधे असल्यानेच या विभागात सारेच अलबेल असल्याचे बोलल्या जाते.
