ग्रामीण भागात आता प्रोटीनयुक्त आहाराचे स्टॉल उभारण्याचा मानस मिनल करनवाल

नांदेड| जंक फूड ऐवजी प्रोटीनयुक्त आहार आरोग्यासाठी महत्त्वाचा असून ग्रामीण भागात आता प्रोटीनयुक्त आहाराचे स्टॉल उभारण्याचा मानस असल्याचे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी व्यक्त केला.
जंक फूड अर्थात फास्ट फुड हे आरोग्यासाठी चांगले नसून जंक फूडच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे रक्तदाब व शुगरचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलं व गरोदर माता यांच्यासाठी तर हे फारच हानिकारक आहे. जंक फूडमध्ये पोषक तत्वाचे प्रमाण कमी असते परंतु त्याच्या चवीमुळे अनेकांना जंग फूड खायला आवडते. परंतु गेल्या २५ वर्षाच्या अभ्यासानुसार फास्ट फुडच्या सेवनाने हृदयरोग, शुगर आदींचे प्रमाण वाढले आहे.
यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मुंबई येथील आयआयटी आहारशास्त्र विभागाशी समन्वय साधून जानेवारी २०२४ मध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच बाल विकास विभागाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका यांची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण दिले. गुरुवार २ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक, आयुष्य, आरबीएसके चे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमची टीम, आहार तज्ञ, बाल तज्ञ यांची बैठक घेऊन प्रथिने का खायची, किती खायची व कुठून खायचे यावर साधक- बाधक चर्चा केली. सुरुवातीला डॉक्टर्सनी एक महिना स्वतःच्या आहारावर लक्ष द्यायचे आहे. दिनांक ३० मे म्हणजे एक महिन्यानंतर परत एकदा ही टीम भेटणार आहे. यावेळी तुम्ही काय केलं, आपण हे करू शकलो की नाही, प्रोटीनयुक्त आहारामुळे आरोग्यावर काय परिणाम झाला यावर चर्चा करण्यात येणार आहे.
त्यानंतर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात जंक फूड एवजी प्रोटीनयुक्त आहारांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच गावस्तरावर प्रोटीनयुक्त आहारांचे स्टॉल उभे करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कारनवाल यांनी सांगितले. या मागचे उद्दिष्ट असे की, लहान बालक, गरोदर माता तसेच सर्वसाधारण नागरिक हे मोठ्या प्रमाणात तळलेली व गोड पदार्थ खातात हे आरोग्याला हानिकारक आहे. ज्यामुळे रक्तदाब, मधुमेह तसेच श्वसन संस्थेवरील होणारे परिणाम जसे की दमा, धाप लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. हे उद्भवणारे आजार जंक फुड मुळेच होत असतात.
त्यामुळे आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त आहार महत्त्वाचे आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद नुसार प्रत्येकाच्या शरीराची प्रोटीनची गरज १ ग्रॅम/ किलोग्राम वजन असे प्रमाणात असणे गरजेचे आहे. परंतु, बऱ्याच अभ्यासांती असे दिसून आलेले आहे की, आपल्या रोजच्या आहारात प्रोटिनची मात्रा गरजेच्या प्रमाणात खूप कमी जाते. त्याला वर उल्लेखलेले कारणे महत्त्वाची आहेत. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराची झीज भरून निघत नाही, रोग प्रतिकार क्षमता वाढत नाही, अनेमियाचे प्रमाण वाढते, शरीर विविध जंतू संसर्ग आजारांना बळी पडते.
तसेच दीर्घ कालावधी मध्ये (वर्षानुवर्षे) योग्य व प्रमाणात प्रोटीन शरीरास नाही मिळाल्यास इतर अ-सांसर्गिक गंभीर आजारांना सुद्धा शरीर बळी पडते. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला, या म्हणीप्रमाणे आपण आजारी पडण्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार महत्त्वाचा असून, पुढे होणारे संभाव्य आजारांचे धोके टाळण्यासाठी आजपासूनच आपल्या शरीरास योग्य प्रमाणात प्रोटीन देणे महत्वाचे आहे (आजारी असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटिन बाबत सल्ला घेऊनच हे करावे). रोजच्या आहारात प्रोटीनची मात्रा वाढविण्यासाठी रोजच्या आहारात व सवयींमध्ये थोडे बदल करणे अनिवार्य आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रोटीनयुक्त आहार सेवन करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कुपोषणमुक्ती व आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
