नागपूर| ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री पदावर असतानाही ठाण्यासारख्या शहरात मुलीला चिरडण्याचा गंभीर प्रकार होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गृहविभाग काय करत आहे ? आणि ठाणे प्रकरणातील गुन्हेगाराला अटक कधी होणार? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील घटनेवर प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाने एक नवीन प्रशासकीय पॅटर्न आणला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्त्या दिला जात आहेत यातून या अधिकाऱ्यांची मुलेही निर्ढावत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात एका मुलीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला त्यातील आरोपीचे नाव अश्वजित गायकवाड असून भारतीय जनता युवा मोर्चाचा तो नेता आहे तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. त्या मुलीशी अश्वजितचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत आहे. वडिल प्रशासनात उच्च अधिकारी असल्यानेच अश्विजित गायकवाडला अटक होत नाही का, असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे.
भाजपाशी संबंधित लोकांमध्ये महिला अत्याचार तसेच बलात्कारांसारखे गंभीर गुन्हे करण्याची हिम्मत येते कोठून? आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे का? कायदा आपले काही बिघडवू शकत नाही? ‘भाजपा है तो सब मुमकीन है’. अशी भावना त्यांच्यात वाढीस लागल्याचे दिसत आहे. मग ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे कशाला देता? महिला सुरक्षेचा ढोल कशाला पिटता ? ठाणे प्रकरणातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला बेड्या ठोका व पीडित मुलीला न्याय द्या, असे अतुल लोंढे म्हणाले.