नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलाचे संचालक व प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रो. एस. पी. चव्हाण यांनी नुकताच ३,००० कि.मी. सायकल प्रवास पार केला. ‘सायकलींग फॉर सायकलिंग’ विद्यार्थ्यांनी व युवकांनी सायकल चालवून आपले आरोग्याचे रक्षण करावे, म्हणजेच ‘सायकल चालवा तंदुरुस्त राहा’ हा संदेश देण्याचा त्यांचा यामागचा हेतू होता.
भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग एन.एच. २७ या मार्गावर आसाममधील गुवाहाटी इथून प्रवास सुरू करून १५ दिवस ४ तासात त्यांनी गुजरातमधील ३,००० हजार कि.मी. चे पोरबंदर शहर गाठले. ईस्ट टू वेस्ट इंडिया सोलो सायकलिंग करणारे ते मराठवाड्यातील पहिले प्राध्यापक आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्यांनी २० दिवसात कश्मीर ते कन्याकुमारी असा ग्रुपमध्ये सायकल प्रवास केला होता. त्यांनी आंटाक्टिका मोहिमेसाठी घेतलेल्या ट्रेनिंगचा खूप उपयोग झाला असे ते सांगतात.
स. ५:३० वा. सायकलिंग सुरू करून संध्याकाळी ६:३० ते ०७:०० वा. मुक्काम केला. यावेळेत दु. २० मि. आराम अशा दैनंदिनीत दररोज २०० ते २२० कि.मी.चा प्रवास केला. भारतात सध्या हिवाळ्याचा हंगाम असल्याने पहाटेच्या दाट धुक्याची प्रवासातील अडचण वगळता वातावरणाबाबत कोणतीच अडचण आली नाही असे ते म्हणाले. अतिशय मोजकी व फक्त अत्यावश्यक साधनं जी सायकलवर फिट होऊ शकतात त्यांचाच त्यांनी उपयोग केला व बिना कॅरिअर व कोणतीच सामानाची बॅग त्यांच्यासोबत किंवा पाठीवर नव्हती. एन.एच. २७ या महामार्गावर जे गेस्ट हाऊस, धाबे व हॉटेल मिळतील तिथे आहे त्या परिस्थितीत मुक्काम केला. प्रवासात फक्त शाकाहार घेतला कोणतेच बाटलीबंद पेय, कोल्ड्रिंक्स किंवा बाटलीबंद पाणी त्यांनी वापरले नाही. त्याऐवजी त्या भागातील लोक वापरत असलेल्या अन्न पाण्याचा उपयोग केला असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
या प्रवासादरम्यान भेटलेल्या अनेक सर्वसामान्य लोकांनी त्यांना जे प्रश्न विचारले व चर्चा झाली त्यातले कॉमन प्रश्न होते की, सायकल किती किमतीची आहे? एवढ्या लांब प्रवासात तुम्ही थकत कसे नाही? हा प्रवास का करताय? या प्रवासासाठी सरकारी अर्थसहाय्य कोणत्या योजनेतून मिळालं की मिळालं नाही? एकटेच कसे काय चालले? इ. इ. आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हे सात राज्य पार करताना सर्व सामान्य लोक आपापल्या कामात व्यस्त होते. मजेत होते व सगळ्यांनी सहकार्य केले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रवासात त्यांच्या सायकल मध्ये व तब्येतीत कोणतेच बिघाड झाले नाहीत असं ते सांगतात. योग्य आहार, दररोजचा सराव, दृढनिश्चय, धाडस या बाबी अंगीकारल्यास भरतात एकट्याने लांबचा सायकल प्रवास करणे शक्य आहे असे ते म्हणाले. या प्रवासात पक्षी निरीक्षण व पक्षांच्या अभ्यासाबाबतही त्यांनी नोंदी घेतल्या.
या धाडसी सायकल प्रवासाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, जैवशास्त्र संकुलातील सहकारी प्राध्यापक आणि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.