नांदेड| चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाने मुसंडी भरली असून देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील राज्यात भाजपाचे सरकार होणार आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यात भाजपाचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि लोकशाहीला बळकटी करणारा असल्याचे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
छत्तीसगड ,राजस्थान ,मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यातील विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पाडले होते . या मतदानाची आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. अनेक एक्झिट पोलचा अंदाज चुकवत भारतीय जनता पार्टीने देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास टाकला असून तिन्ही राज्यातील भाजपाचा विजय हा ऐतिहासिक ठरला आहे .
त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकट करणारा हा विजय असून, या निकालाने भारतीय जनता पार्टी , लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सार्थ विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल आणि तेही ऐतिहासिकरित्या स्थापन होईल असा विश्वासही खा. चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. तिन्ही राज्यातील नवनिर्वाचित सर्व आमदारांनाही भविष्यासाठी खा. चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.