एखाद्या चित्रपटाला शोभेल अशाप्रमाणे मराठवाड्यात मुक्तपणे देशी बनावटीच्या कट्ट्यांचा वापर सुरू आहे. मराठवाड्यात गेल्या ११ महिन्यात जवळपास ७९ देशी बनावटीचे कट्टे जप्त करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक देशी बनावटीचे कट्टे नांदेड जिल्ह्यात जप्त करण्यात आले आहेत तसेच मराठवाड्यात सर्वाधिक गुन्हेगारी देखील नांदेड जिल्ह्यात होत असल्याचे अलीकडच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दिवसाढवळ्या सिने स्टाईल हातात तलवारी घेऊन रस्त्यावर खून करण्याच्या घटना देखील नांदेडमध्ये वाढल्या आहेत. मराठवाड्यातील नांदेड व बीड जिल्ह्यात असे काही प्रकार नुकतेच दिसून आले. तसेच ऐन दिवाळीच्या दिवशीही ‘खून का बदला खून’ या पद्धतीने नांदेडच्या भर रस्त्यावर थरार करीत तलवारीने व चाकूने एकाचा निघृण खून करण्यात आला. तसेच पंधरा दिवसांपूर्वी नांदेड शहरातील गजबजलेल्या इतवारा भागात सिनेस्टाईल पद्धतीने १५ जणांच्या टोळक्याने एका २५ वर्षीय युवकाचा रस्त्यात गळा कापून खून केला. गुन्हेगारी ही कधीही कमी होणार नाही किंवा बंद होणार नाही , असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी एका सत्कार सोहळ्यात म्हटले होते.
गुन्हेगारी जरी बंद करता येत नसेल तर त्यावर अंकुश मात्र नक्कीच ठेवता येऊ शकतो. त्यासाठी मात्र कायदा व सुव्यवस्थेचे पालन पोलीस प्रशासनाकडून होणे तेवढेच गरजेचे व जिकरीचे आहे. पोलिसांची भीती गुन्हेगारांवर असणे खूप आवश्यक आहे. फक्त भीती जरी असेल तरी गुन्हेगार गुन्हा करताना शंभर वेळेस विचार करतो. परंतु अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनही गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी झालेले नाही. मराठवाड्यातील नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने उच्चांक नोंदविला आहे. देशी बनावटीच्या कट्ट्यांचा मुक्तपणे वापर करत हप्तेखोरी तसेच व्यापाऱ्यांना धाक दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये काढण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढीस लागले आहेत. पोलिसांची भीती कमी झाल्याने चक्क ग्रामीण भागात तुरी व कापसाच्या शेतात गांजाची लागवड केली जात आहे. गुन्हेगारी वाढविण्याला हे आरोपी हातभार लावत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात मराठवाडा पॅटर्न नावारूपाला येत असल्याची भीती राज्यातील काही पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हापसापुर शेत शिवारात स्थानिक पोलिसांनी धाड टाकून कापसाच्या पिकात लागवड केलेली गांजाची दहा लाख ८० हजार रुपये किमतीची २३५ झाडे नुकतीच जप्त केली. त्या झाडांचे वजन केले असता ४५ किलोपेक्षा अधिक वजनाची झाडे पोलिसांना आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी शेतमालक गुलाब तुळशीराम सवंडकर व आदर्श गुलाब सवंडकर या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध हट्टा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात एका डोंगराळ भागात आढळून आला. तेथील बोरवाडी या शेतात पाच ते सहा गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका शेतात धाड मारून त्या ठिकाणी कापूस व तूर पिकाच्या शेतात जिवंत गांजाची चार ते पाच झाडे जप्त केली.
बोरवाडी येथील शेत सर्वे नंबर १० मध्ये दशरथ पवार यांच्या शेतात ही गांजाची झाडे जप्त करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरानजीक असलेल्या फकराबाद मोहल्ला या भागात एका घरात ठेवलेला पाच किलो गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी शेख रशीद शेख नन्नू याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अवैध व्यवसाय, वाढलेली गुन्हेगारी ,सातत्याने होणारे खून, दरोड्याच्या घटना या सर्व घटना पाहता मराठवाड्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे की काय? अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे.
मराठवाड्यातील पोलीस प्रशासनाला गुन्हेगारीवर अंकुश मिळविता आलेला नाही. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावे , अशी मागणी भाजपाच्या प्रांत कार्यकारिणीच्या सदस्यांनी केली आहे. मराठवाड्यातील वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांचे अभय आहे की काय? अशी शंका घेण्यास निश्चितच जागा आहे. अंगावर मंगळसूत्र घातलेली महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती मंगळसूत्र सहित घरी येईल की नाही? अशी भीती निर्माण करणाऱ्या घटना संपूर्ण मराठवाड्यात सातत्याने घडत आहेत. मुलाला शाळेला सोडायला जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करणे तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करणे त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणे या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
मराठवाड्यातील पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यात दिसून येत आहे. मराठवाड्यात देशी बनावटीचे पिस्तूल सर्रासपणे वापरले जात आहे. मध्य प्रदेशातून तसेच उत्तर प्रदेशातून हे पिस्तूल मराठवाड्यात आयात केले जातात . अनेक गुन्हेगारांकडून हे पिस्तूल हस्तगत केल्यानंतर पोलिसांना त्यांची संपूर्ण माहिती मिळालेली आहे. विशेष म्हणजे १६ ते ३० वर्ष वयोगटातील तरुणांकडून अशा प्रकारे पिस्तूल जप्त केले गेले आहेत. पिस्तूल व देशी कट्ट्याचा धाक दाखवून गुन्हेगारी करणे तसेच वसुली करण्याचे प्रकार मराठवाड्यात बिन दिक्कतपणे घडत आहेत. गेल्या ११ महिन्यात मराठवाड्यात ७९ देशी बनावटीचे कट्टे जप्त करण्यात आले. यापेक्षा कितीतरी अधिक पटीने देशी बनावटीचे कट्टे मराठवाड्यात तरुणांकडे असल्याची भीती देखील पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. कोणताही पोलीस अधिकारी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करू शकत नाही, हे देखील तेवढेच सत्य असले तरी किमान पोलिसांची भीती गुन्हेगारांवर असणे गरजेचे आहे . त्यासाठी पोलिसांना मुक्त हस्ते गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करू देणेदेखील तेवढेच गरजेचे वाटते.
नांदेड मध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे . यामध्ये विशेषतः अल्पवयीन गुन्हेगार तसेच विधी संघर्ष बालक यांचा समावेश आहे. अनेक गुन्हेगारांनी स्वतःच्या गॅंग तयार केल्या आहेत. त्या गॅंगच्या माध्यमातून ते हप्तेखोरी ,वसुली, धाक धपटशाही असे प्रकार बिन दिक्कतपणे सुरू आहेत . रस्त्यावर खून करणे तर खूपच सोपे झाल्याचे नांदेडमध्ये घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. खुनाचे प्रकार अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अनेक प्रकरणात खून करणारे आरोपी व त्यांचे सहकारी पोलीस प्रशासनाला सापडत असले तरी असे प्रकार वारंवार घडत असल्याने गुन्हेगारांवर अंकुश नसल्याचेच हे द्योतक आहे. नांदेड मध्ये आजही तत्कालीन पोलीस अधीक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण , रवींद्र सिंघल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या आठवणी काढल्या जातात. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर खूप मोठा अंकुश होता. तसाच पोलिसांचा अंकुश व पोलिसांची भीती समाजात दिसून येणे गरजेचे आहे . जोपर्यंत पोलिसांची भीती राहणार नाही तोपर्यंत अल्पवयीन गुन्हेगार तसेच विधी संघर्ष बालक पुन्हा पुन्हा गुन्हे करण्यासाठी पुढे येणार नाहीत.
लेखक – डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र,, abhaydandage@gmail.com