मिनल करनवाल यांनी शिक्षण विभागातील प्रलंबित गट विमा योजना, सेवानिवृत्तीचे लाभासह विविध प्रश्न निकाली काढले
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शिक्षण विभागात असलेल्या विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेऊन गट विमा योजना, सेवानिवृत्तीचे लाभासह विविध प्रश्न निकाली काढले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विविध विभागात सुसुत्रता आणण्यासाठी खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठक घेऊन कामांचा निपटारा केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक दिवसांपासून गट विमा योजनेचे 45 तर सेवानिवृत्तीच्या लाभाचे 134 शिक्षकांचे आर्थिक लाभासह चटोपाध्याय वेतश्रेणीचे प्रकरणे प्रलंबित होते. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शिक्षणाधिकारी, अधीक्षक, लेखाधिकारी, संबंधी शाखेचे कर्मचारी यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणे आठ दिवसात निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार शिक्षण विभाग कामाला लागला. बरोबर आठ दिवसात हे सर्व प्रकरणे निकाली काढले आहेत. यामध्ये 36 माध्यमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला. 134 शिक्षकांना सेवानिवृत्ती संदर्भातील अंशराशीकरण व सेवा उपदान निधीचा लाभ मिळाला तर 20 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गट विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात येणारे तारांकित प्रश्न, अभ्यागतांनी भेटी दरम्यान दिलेले निवेदने तसेच विभागातील विविध प्रकरणाच्या फाईली वेळेत काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत. कर्मचारी कार्यालयात वेळेत यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व मजल्यावर सेंट्रलाइज बायोमेट्रिक मशीन देखील बसविण्यात आले आहेत.