जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन
नांदेड| मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गावातील जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) उपलब्ध असतील तर त्यांनी अशा नोंदवह्या संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयात रितसर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहेत.
मराठा समाजातील व्यक्तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने 1967 पूर्वी कार्यरत पोलीस पाटील यांचेकडील गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) मध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा जात नोंदी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुने पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांनी अशा नोंदवह्या उपलब्ध असल्यास तहसिल कार्यालयास जमा कराव्यात असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.