नांदेड,अनिल मादसवार| युवकांच्या सर्वागिण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने युवा महोत्सवाचे 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नांदेड येथे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या आयोजनात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून सुक्ष्म नियोजन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात युवा महोत्सवाचे आयोजनाबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, डॉ. सान्वी जेठवाणी आदींची उपस्थिती होती.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षीच्या जिल्हा युवा महोत्सवात कृषी विभागाने दिलेल्या संकल्पनेनुसार युवा वर्गाला सहभागी करुन घेवून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचित केले. तसेच तृणधान्याचे आहारातील महत्व प्रत्येकाला कळावे यासाठी तृणधान्यांच्या पदार्थाचे प्रदर्शनही या महोत्सवात भरविण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
सांस्कृतिक, कौशल्य विकास, संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृती याबाबीचा समावेश असणार आहे. या बाबीमध्ये लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, फोटोग्राफी, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), अस्पर्धात्मक बाबींचे आयोजन इ. उपक्रमाचा समावेश असणार आहे. युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवा सहभागी होवू शकतील.