क्रीडा

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत १० पट वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपूर| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलिम्पिक ची सुरवात झाली असून सन 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतील, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उद्घाटन समारंभाला आमदार रामदास आंबटकर, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दूरसिंह चव्हाण, धावपटू हिमा दास, ललिता बाबर, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड आदी उपस्थित होते.

खेलो इंडिया, फिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल, असे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिक ची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

भविष्यात पदक प्राप्त खेळाडू मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बल्लारपुरात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पदक प्राप्त करणारे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव कमावणारे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळातून आत्मविश्वास निर्माण होतो. खेळ भावनेतूनच व्यक्तिमत्व पूर्ण होते. देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंनी खेळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले

मिशन ऑलिम्पिक 2036 मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भूमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मिशन ऑलिम्पिक 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलिम्पिक 2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजित कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने शपथ दिली.

अभूतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला ‘लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले. खेळाडूंचे ध्वजसंचलन : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी ध्वजसंचलन करीत आपापल्या राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1551 खेळाडू दाखल झाले आहेत.चंद्रपूर गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे विमोचन : चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!