कुठल्याही फसव्या आमिषाला बळी न पडता महिलांनी सजग होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे – राजश्रीताई पाटील
उमरखेड,अरविंद ओझलवार। सध्याच्या डिजिटल युगात कुठल्याही फसव्या आमिषाला बळी न पडता महिलांनी सजग होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांनी केले . गोदावरी अर्बन बँक शाखा उमरखेड आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथे नुकताच अर्थसाक्षरता अभियान आणि ग्राहक मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.
काळ बदलत चालला आहे. जीवन सहज, सोपे, सजग आणि सेफ होण्यासाठी महिलांनी अर्थ साक्षरतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंब आणि संसाराचा ताळमेळ घालत महिलांनी विविधांगी शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःचा व्यवसायातून उत्पन्न वाढ करायची असेल तर मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही फसव्या आमिषाला बळी न पडता महिलांनी सजग होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. यातूनच आपला सामाजिक आणि आर्थिक साधत एक नवे पाऊल टाकावे असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांनी केले आहे. गोदावरी अर्बन बँक ग्राहकांना सर्वोतोपरी सेवा देण्यास कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या महागाव तालुक्यातील कोठारी येथिल प्रणिता काळे यांचा विशेष सत्कार गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदरील मेळाव्याला कीर्तीका कदम यांचे विशेष सहकार्य लाभले .
यावेळी मंचावर चितांगराव कदम,सविताताई कदम, निधीताई भुतडा, कृपासागर हरडपकर, ओमप्रकाश हरडपकर, संदीप ठाकरे, प्रकाश गादेवार, कविता मारोडकर, सविता पाचकोरे, सुनिता देशमुख, किर्तीका कदम, गोदावरी अर्बन बँकेचे रवी इंगळे,मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे,गणेश शिंदे, प्रणिता काळे, उपस्थित होते यासह उमरखेड शाखेतील कर्मचारी ,विवीध बचत गटातील महिलांची उपस्थिती होती.