नांदेड। येथे दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आई व मूल दगावलेल्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबादास दानवे म्हणाले कि, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणा आहे. औषधांची कमतरता, निष्काळजीपणा, वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून राहिलेल्या फाईली हेच या घटनेच्या मागचे कारण आहे. कोणत्या डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली. ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली… ? याचं स्पष्टीकरण सरकार देईल का?
रुग्णालयात मनुष्यबळ अपुरे असेल तर ते का..? दिले गेले नाहीत? इथे लोक मारतात आणि सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला मुजरा मारायला जातात. तातडीने आनंदाचा शिधा मंजूर होतो (वाटला जातो की नाही, देव जाणे) पण औषधी आणि रुग्णालयात सुविधा देण्या संबंधीच्या फाईली लाल फितीत का ठेवल्या जातात. याकडे मुख्यमंत्र्यांचा लक्ष नाही का? पालकमंत्री नियमितपणे रुग्णालयात येऊन बसले, आढावा घेतला तर डॉक्टरांची निष्काळजीपणा करण्याची हिंमतच होणार नाही.