वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दोन बसगाड्या समोरासमोर धडकल्या
देगलूर/नांदेड। नांदेड – देगलूर मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बागनटाकळी येथील वळण रस्त्यावर वादळी पावसाने समोरील वाहनाचा अंदाज लागला नसल्याने कर्नाटक व महाराष्ट्र महामंडळाच्या दोन बसगाड्या समोरासमोर धडकल्याची घटना बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 12 प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगितले जाते आहे.
देगलूर एस टी महामंडळ आगाराची देगलूर – बिलोली ही बस क्रमांक एमएच14 – बीटी1780 प्रवासी घेऊन जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. देगलूर तालुक्यातील बागनटाकळी येथे एका वळणावर समोरून येणाऱ्या बसचा अंदाज लागला नाही. तसेच भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक -बिदर आगाराची बस क्रमांक ए38 – एफ 1013 च्या चालकालाही पावसामुळे पुढील बसचा अंदाज लागला नाही. यात दोन्ही बस समोरासमोर धडकल्या. या धडकेत महाराष्ट्र बसमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यासोबतच वाहक आणि चालक यांनाही मार लागला आहे. तसेच दुसऱ्या बसमधील 9 ते 7 प्रवास जखमी झाले असून, या सर्वांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यात नागमणी काशीराम कोंडावर वय ६० वर्षे राहणार तेलंगाणा राज्यातील बिचकुंदा वर्षे, लक्ष्मण मष्णाजी कल्लेवाड राहणार हिंगणी तालुका बिलोली वय ७० वर्षे, मष्णाजी नागन्ना बक्कनवार रा. खानापूर तालुका देगलूर वय ५९ वर्षे, वाहक वनिता सुर्यकांत कांबळे वय ३१ वर्षे, अरुणा प्रताप राखे वय २८ वर्षे रा. लोहगाव, ता बिलोली, गंगाबाई सायन्ना मलकुलवार वय ६० रा. कुंडलवाडी, शुभम शिवलिंग जायवार वय १४ वर्षे रा. कुंडलवाडी ता. बिलोली, शेख नसीर शेख नुर वय २२ वर्षे रा. गौसकालनी परभणी, शेख आसीफ अब्दुल रऊफ वय ३५ वर्षे चाकुर जिल्हा परभणी, सुधाकर नागोराव वाघमारे वय ६५ रा. पोकर्णी या. बिलोली, वैभव विनायक राहेगावकर वय ३५ विशाल नगर नांदेड, घाळप्पा चंद्रकांत मडीवाळ वय ३५ वर्षे, शितल घाळप्पा मडीवाळ वय २९ वर्षे, विजय घाळप्पा मडीवाळ वय ५ वर्षे सर्व राहणार हुलसुर जिल्हा बिदर यांचा जखमीमध्ये समावेश आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने पोलिसांनी ती गर्दी दूर करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली एकूणच या दुर्घटनेत बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अपघातामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.