नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठे मुंबईकडे कुच करणार -सकल मराठा समाजाचा निर्धार; तयारी अंतिम टप्प्यात
नांदेड| दि.18. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून घेण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साद घालीत नांदेड जिल्ह्यातून हजारो समाज बांधव आप आपल्या वाहनातून उद्या अंतरवाली सराटी कडे कुच करणार आहेत आणि तिथून मग जरांगे पाटील यांच्या सोबत पायी रॅली मध्ये समाविष्ट होऊन अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास करून 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आझाद मैदानावरील उपोषणात सामील होणार आहेत अशी माहिती नांदेडचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली.
शासनाच्या शिष्टमंडळासोबत अनेक बैठका पार पडून सुद्धा मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण कसे द्यायचे यावर कुठलाही समाधान कारक तोडगा निघत नसल्यामुळे 23 डिसेंबर रोजी अखेर जरांगे पाटील यांनी बीड च्या ईशारा सभेतून शासनाला ईशारा देत मराठा समाजाला आवाहन केले होते की, काहीजरी झालं तरी 20 जानेवारी ला राज्यातील तमाम समाजबांधवाने मुंबईत धडकल्या शिवाय स्वस्त बसायचं नाही. मग काय समाजासाठी जीवाची बाजी लाऊन लढणाऱ्या योद्धाचा आवाज येताच समाज खडबडून जागा झाला आणि आप आपली कामे आटोपून मुंबईची तयारी करू लागला कुणी ट्रॅक्टर तयार कर, कुणी टेम्पो तर कुणी ट्रक,क्रूझर, तवेरा अशा वाहनातून हजारो समाज बांधवानी अखेर मुंबई कुच करायची ठरवली. जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यानी अंतरवाली सराटी येथे एकत्र येऊन येथुन मिळून जायचं म्हंटल्यामुळे नांदेड जिल्ह्यातून हजारो समाज बांधव हे अंतरवाली येथे 20 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने आप आपली वाहने घेऊन निघत आहेत.
विशेष : जिजाऊ नगर वाडिपाटी येथे जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणच्या समाज बांधवानी तर अतिशय जबरदस्त तयारी केलेली दिसुन आली ट्रॅक्टर च्या ट्रॉली वरतीच आपला जवळपास एक -दोन महिन्यांचा संसार थाटला मोबाईल चार्जिंग साठी प्लग, रात्रीच्या अंधारात लाईट ची व्यवस्था, जवळपास 250 लिटर एवढ्या प्रमाणात फिल्टर पाणी, जनरेटर व ते चार्जिंग करण्यासाठी सौर प्लेट, झोपायला गाद्या व स्वयंपाक करण्यासाठी दोन गॅस सिलिंडर शेगडी आणि किमान दोन महिने पुरेल इतके भोजन साहित्य. हे सर्व एका ट्रॅक्टर मध्ये व्यवस्थित मांडणी करून 40-45 जणांचा जथा हा एक दिवस अगोदरच रवाना झाला आहे. अशा प्रकारची वेगवेगळी वाहने तयार करून कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, नायगाव,मारतळा,बिलोली, धर्माबाद, उमरी मुदखेड, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, हदगांव यासह अनेक ठिकाणाहून मराठ्यांचे जथे च्या जथे मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत.
मराठ्यांचा गनिमी कावा…
मुंबई कडे जाणाऱ्या वाहनाना शासन प्रशासन कुठेतरी अडमुठी धोरण अवलंबून वाहने आडवण्याच्या प्रयत्नात असताना मराठ्यांनी मात्र गनिमी कावा करीत सजावट केलेली वाहने ही रात्रीतूनच अंतरवाली सराटीला पाठवून दिली. मागील काही दिवसापासून मराठ्यांनी अनेक तालुक्या तालुक्यातच नाही तर गावा गावात सुद्धा गुप्त बैठका घेत मुंबई तयारीची चुणूक सुद्धा प्रशासनाला लागु दिली नाही. गावागावातून लोकवर्गणी गोळा करीत गाडी, डिझेल व मुंबई गाठण्याचा खर्च जमा केला. मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक जण आंदोलनाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक मराठा हा पेठुन उठला एवढं मात्र नक्की, आता काही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा निर्धार करूनच समाज बांधव हा नांदेडहुन मुंबई कडे कुच होताना दिसुन आला. अंतरवाली सराटी येथुन शनिवारी 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता जरांगे पाटील यांच्या सोबत मराठवाड्यातील या आठही जिल्ह्याचे समाज बांधव पद यात्रेला सुरुवात करतील व रस्त्याने जी जी गावे, तालुके, जिल्हे लागतील त्या त्या ठिकाणाहून लाखों समाज बांधव जुळल्या जातील व 26 जानेवारी रोजी करोडो मराठे हे मुंबई च्या आझाद मैदानावर धडकतील आणि जो पर्यंत सरकार मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करणार नाही तो पर्यंत मराठे मुंबई सोडणार नाहीत.