31 जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करावे – डॉ. गजाजन खराटे
छत्रपती संभाजी नगर| मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलीत करण्यासाठी सर्व्हेक्षण करीत आहे. हे सर्वेक्षण सर्व जिल्ह्याने 31 जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य मा. गजानन खराटे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटूंबाचे होत असलेल्या सर्व्हेक्षणाचा व जमीन अधिग्रहणाविषयीचा आढावा घेण्यात आला. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ.प्रा गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, उपायुक्त जगदिश मिनीयार,निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते ,दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना, बीड,परभणी, धाराशिव, लातूर,नांदेड, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त बैठकीत सहभागी होते.
प्रा.डॉ.काळे म्हणाले, मराठवाडा विभागात आयोगाने नेमून दिलेले सर्वेक्षणाचे काम महसूल विभागाने चांगले केले आहे, याबाबत आयोगामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन. कोणत्याही जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील एक ही कुटुंब सर्वेक्षणतून सुटू नये सर्वांची नोंद घेण्याची खबरदारी जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली . सर्वेक्षण साठी नवीन 1.03 ऍपद्वारे करण्यात यावे. प्रत्येक वाडी ,वस्ती, तांडा, व्यवसाय ,रोजगारसाठी स्थलांतरीत झालेले तसेच शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंद घ्यावी.
वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी,31जानेवारीपर्यत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री आर्दड यांनी दिले. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटूंब सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय आढावा उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी अयोगाच्या तिन्ही सदस्यासमोर सादर केला.