नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव या विषयावर आधारित बोधचिन्ह तयार करण्यासाठी खुल्या बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने ज्या स्पर्धकांनी ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सवाच्या विषयानुषंगाने तयार केलेले बोधचिन्ह विहित मुदतीत विद्यार्थी विकास विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यांचे तज्ञांकडून परीक्षण करून अंतिम निकाल घोषित करण्यात आला असून यामध्ये पल्लवी मैंदरकर यांच्या सर्व समावेशक असलेल्या बोधचिन्हाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.
सदर बोधचिन्ह विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सवासाठी असल्याकारणाने यामध्ये कला, संस्कृती, साहित्य, संगीत, नृत्य व नाट्य या विषयाचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह तयार करण्यासाठी खुल्या बोधचिन्ह निर्मिती स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी, कलाकार वा इतर सर्जनशील व्यक्तीनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या बोधचिन्ह विजेत्या स्पर्धकाला विद्यापीठाच्या वतीने पाच हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी दिली.