नांदेड| गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आता सप्तरंगी साहित्य मंडळाच्या कवी आणि कवयित्रींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून पाठींबा दर्शविला आहे. आॅनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अनोख्या काव्यमैफिलीत मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असतांनाच सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले असले तरी पुढील काळात मराठा समाजाच्या जनभावना लक्षात घेता सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी केली.
यावेळी ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे, बाबुराव पाईकराव, कवयित्री रुपाली वागरे वैद्य, विद्रोही कवी मारोती कदम, कवी मंगल सोनकांबळे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवी दिगांबर कानोले, बालकवी ओमकार कळसे यांची उपस्थिती होती. सद्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. विविध ठिकाणी उपोषण करण्यात आले. आंदोलकांनी हिंसक भूमिका घेतली. संबंधित आंदोलनाचा सर्वसामान्य जनजीवनावर परिणाम झाला. समाजाच्या भावना तीव्र आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सप्तरंगी साहित्य मंडळाचीही भूमिका आहे.
आॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण काव्यमैफिलीत ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी आक्रोश लेकरांचा, युवा कवी मंगल सोनकांबळे यांनी ‘मराठ्यांची हाय रास्त मागणी’, ज्येष्ठ कवी दिगांबर कानोले यांनी ‘लढता ठेवू लढा’, कवयित्री रुपाली वागरे वैद्य यांनी ‘आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर’, विद्रोही कवी मारोती कदम यांनी ‘कुणबीपासून सुरू झाला लढा’, ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी अनुरत्न वाघमारे यांनी ‘तीन माकडाची टोळी’, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी ‘५८ मोर्चे काढले’ तर बालकवी ओमकार कळसे यांनी ‘गरिबीसाठी आहे आरक्षण’ ह्या दमदार कविता सादर करुन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.