हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सोनारी गावात विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध करण्यात आला असून, एका मराठा आंदोलकांने आज सकाळी गावात आलेल्या विकसित भारत यात्रेच्या रथाला विरोध करून गावात येण्यापासून रोखले आहे. सोबतच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगा असे ठणकावून सांगितले आहे.
नांदेड जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध होऊ लागला असल्याचे आज पाहावयास मिळाले असून, नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यातील सोनारी गावात आज सकाळी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ दाखल झाला होता, हे लक्षात येताच येथील मराठा सेवक श्रीदत्त पाटील सोनारीकर यांनी शाळेसमोर रथ रोखला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात ना सरकारच्या योजनांचा प्रचार करू देणार नाही असा पवित्र घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोध करत हा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ परतावून लावला आहे.
जोपर्यंत मराठा आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत गावबंदी करण्यात आली आहे, हे तुम्हाला माहित नाही का..? असा सवाल रथासोबत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केला. जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत गावात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, शासनाला कोणत्या योजनाचा प्रचार करू देणार नसल्याची भूमिका यावेळी मराठा आंदोलक श्रीदत्त पाटील पवार यांनी घेतली. विशेष म्हणजे होणारा विरोध पाहता विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी वाहनासह सोनारी गावातून काढता पाय घेत रथ माघारी फिरवला आहे.