मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन बडोदा येथे उत्साहात संपन्न
नांदेड| मराठा सेवा संघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन दिनांक 8 व 9 डिसेंबर 2023 रोजी बडोदा येथे उत्साहात पार पडले. या महाअधिवेशनात मराठा समाजातील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. अधिवेशनाला देशभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महाअधिवेशनासाठी श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांचे वंशज श्रीमंत समरजीतसिंह गायकवाड महाराज, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगनायक ॲड.पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर, सुरतचे आमदार सौ.संगीता पाटील, नरेंद्र पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संजय पाटील, अर्थकोष कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सोपान क्षिरसागर, राष्ट्रीय महासचिव प्रदीप पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.निर्मला पाटील, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष अशोक पवार, राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्यासह मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच भारताच्या विविध राज्यातून आलेले मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ प्रणित इतर 33 कक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारणीतील इतर पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
मराठा सेवा संघ ही चळवळ गेल्या तीन दशकांपूर्वी महाराष्ट्राच्या अकोला शहरात सुरू झालेली एक छोटीशी चळवळ आज भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. एवढेच नाही तर देशाबाहेरही मराठा सेवा संघाच्या कार्याची गती सुरू झालेली आहे. भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये मराठा सेवा संघाच्या चळवळीचे काम हे अत्यंत वेगाने सुरू झाले आहे. सर्वच प्रदेशांमध्ये मराठा सेवा संघाचा विचार जाऊन पोहोचलेला आहे. मराठा सेवा संघाच्या परिवर्तनवादी पुरोगामी विचाराने गेल्या तीन दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवस्पद कार्य केले आहे.
महाराष्ट्रातील जातीय व सामाजिक तसेच धार्मिक सलोखा कायम ठेवण्यामध्ये मराठा सेवा संघाचे योगदान हे बहुमूल्य स्वरूपाचे राहिले आहे. महाराष्ट्रातील जातीय व धार्मिक दंगली कमी करण्यामध्ये मराठा सेवा संघाचा फार मोठा वाटा असल्याचा अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला पाठवलेला आहे. यातूनच मराठा सेवा संघाच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. मराठा सेवा संघाचे हे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन बडोदा शहरांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
सदर अधिवेशनात मराठा सेवा संघाची शिवधर्म दिनदर्शिका इंग्रजी 2024 चे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी मराठा सेवा संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे संपन्न झाले होते आणि आता दुसरे महाअधिवेशन बडोदा येथे संपन्न झाले आहे. या अधिवेशनासाठी भारतातल्या विविध प्रदेशांमधून मोठ्या संख्येने मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य इतर सर्व कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्यकारीणी सदस्य यांचा मोठा सहभाग होता. सर्वांच्या उपस्थितीत हे अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.