नायगाव, रामप्रसाद चन्नावार। इमारतीमधील घाण व कचरा साफ करण्याच्या कारणावरून मनात राग धरून भाडेकरूने घर मालकास पहिल्या मजल्यावरून ढकलून दिल्याने खाली पडून घरमालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वसंतनगर मधील मटन मार्केट समोर दगडू आप्पा मलमवार यांची तीन मजली इमारत असून, या इमारतीमध्ये अनेक जण भाड्याने राहतात. याच इमारतीमध्ये खालच्या शटरमध्ये राम बालाजी भैरेवाड (रा.बोरगडी ता.हिमायतनगर ) हे धनलक्ष्मी लॉमिनेशन डोअर ऑफ फर्निचर वर्क्स या नावाने दुकान चालवतात तर वरच्या मजल्यावर दोन रूम भाड्याने घेऊन राहतात. भैरवाड व घरमालक मलमवार यांचे साफसफाई ठेवण्याच्या कारणावरून वाद होत असत. त्यामुळे भैरवाड यांना शटर व रूम रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचा राग भैरेवाड यांच्या मनात होता. १७ नोव्हेंबर रोजी घरमालक मलमवार व भाडेकरू भैरेवाड यांच्यात वाद झाला.
आता कसे भांडण करतोस, तुला खतम करून टाकतो, असे म्हणून दगडुअप्पा मलमवार यांना वरून ढकलून दिल्याने ते खाली पडून रक्तबंबाळ झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गजानन मलमवार यांच्या तक्रारीवरून भैरेवाड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील.पोलिस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक एस. एस. बाचावार हे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी राम भैरेवाड यास ताब्यात घेतले आहे.