श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| निसर्ग कृपेने माहूर तालुक्याला मोठे जंगल क्षेत्र लाभलेले असून हजारोच्या संख्येने लाकूडतोड होत असताना शासनाकडून रोपवाटिका साठी अनुदान देऊन लाखो रोपे तयार करण्यात आली पण ही रोपे गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावरच फेकून दिलेली असल्याने वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दिन जाव… तनखा आओ… या सदरात नोकऱ्या करत असून, वृक्षतोड थांबविण्यात अपयश आले आहे. असे असताना किमान कोट्यावधी रुपये खर्च करून उगवलेली रोपे जंगलात व्यवस्थित लावली जात नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वन मित्र बंडूभाऊ राठोड पालाईगुडाकर यांनी केली आहे.

जंगलाच्या संरक्षणासाठी शासन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत तर दुसरीकडे रोपवटिकेत रोपे उगवण्यासाठी ही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात फक्त किनवट माहूर तालुक्यातच जंगल शिल्लक असल्याने येथील जंगल तरी अबाधित रहावे. यासाठी शासन स्तरावरून जोरदार प्रयत्न होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हे शासनाकडून निधी आणत इतर कामातच व्यस्त राहत असल्याने जंगल संरक्षणाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. जंगलाला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना कार्यालय परिसरात बनत असलेल्या गार्डनला त्यांनी तार कंपाउंड ची संरक्षक भिंत उभारून कोट्यावधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या गार्डनच्या कामाला निकृष्ट कामाची झालर लावली आहे. त्यामुळे त्यांचे जंगल संरक्षणाकडे आणि जंगल वाढविण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

तांदळा आणि दत्त मांजरी येथे रोपवन आणि तुळशी येथे रोपवाटिका या तिन्ही ठिकाणी लाखो रोपे तयार करण्यात आलेले आहेत यापैकी वृक्ष लागवडीच्या नावावर लाखो रोपे फेकून देण्यात आलेली असून जून महिन्याच्या सुरुवातीला रोपांची लागवड होणे अपेक्षित असताना तीन महिने उलटूनही रोपे रस्त्यावर फेकलेली असल्याने अनेक सागवानी मौल्यवान रोपे मरणासन्न अवस्थेत असून खड्डे करण्यासाठी जेसीबी लावून रक्कम उचलण्यात आल्याची चर्चा होऊन बंद झाली.

तरीही रोप लागवड न झाल्याने येणारे जाणारे नागरिकही वन विभागाच्या या कामाप्रती नाराजी व्यक्त करत आहेत परंतु याचा काहीच फरक अधिकारी कर्मचाऱ्यावर पडत नसल्याने जिवंत असलेले रोपे तरी लावली जावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असतात. सदरील बाबीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडू राठोड यांनी जाय मोक्यावर जाऊन रस्त्यावर पडलेल्या रोपांची पाहणी करत रोप लागवड आणि खड्डे करण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार केली असून, याप्रकरणी कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
